आयपीएलसाठी परदेशी खेळाडू न आल्यास BCCI करणार कारवाई


मुंबई : आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतीच झालेल्या विशेष कार्यकरणी बेठकीमध्ये दिली होती. आयपीएलचे उर्वरित सामने येत्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येणार आहेत. पण आयपीएलचे ठिकाण आणि वेळ बदलल्यामुळे परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना काही दिवसांपूर्वी टी-20 वर्ल्डकपसाठी सराव करायचे कारण देत आयपीएल खेळण्यास नकार दिला. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनेही खाजगी कारण देत यूएईला येण्यास नकार दिला. अजूनही काही खेळाडूंच्या येण्यावर प्रश्नचिन्ह असल्यामुळे बीसीसीआय विविध प्रयत्न करुन परदेशी खेळाडूंना खेळवण्याच्या प्रयत्नात आहे. पण अखेर न खेळणाऱ्या खेळाडूंवर कारवाई केली जाणार असल्याचेही समोर येत आहे.

एखाद्या खेळाडूवर आयपीएलमधील कोणताही संघ जेवढी बोली लावतो. तितकी रक्कम पगार म्हणून त्याला दिली जाते. त्यातील काही कर आणि संबधित खेळाडूच्या क्रिकेट बोर्डाला दिल्यानंतर उर्वरित रक्कम 3 ते 4 टप्प्यांत खेळाडूला दिली जाते. पण अशावेळी खेळाडूला दुखापतीशिवाय सामने खेळता आले नाहीत, तर त्याचे मानधन कापण्याचा अधिकारही संघाला देण्यात आला आहे. उदाहरणार्थ कोलकाता नाइट रायडर्सने पॅट कमिन्सला 2020 मध्ये 15.5 कोटींना विकत घेतले होते. आयपीएलचे आतापर्यंतचे सामने तो खेळला आहे. पण युएईत खेळवण्यात येणाऱ्या उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळला नाही, तर त्याला फक्त 7.75 कोटी रुपये एवढेच मानधन मिळेल.