या महिलेने कबरीवरील स्मृतीशिळेवर कोरली चॉकलेट फज रेसिपी
न्युयॉर्क मधील महिला कॅथरीन अँड्र्यूज फार उत्तम प्रकारचे चॉकलेट फज बनवीत असे. घरी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना ती मोठ्या आनंदाने हे फज खिलवीत असे. तिला स्वतःलाही तिच्या हाताचा हा पदार्थ अतिशय प्रिय होता. त्यामुळे तिच्या मृत्युनंतर तिने या चॉकलेट फजची रेसिपी तिच्या कबरीवरील स्मृती शिळेवर कोरली जावी अशी इच्छा व्यक्त केली होती. तिची इच्छा तिच्या मुलीने पूर्ण केली आहेच पण जो कुणी ही शिळा पाहतो त्याच्या चेहऱ्यावर नकळत स्मित येते आणि याच प्रतिक्रियेची कॅथरीनला अपेक्षा होती.
कॅथरीनची कबर तिच्या पतीशेजारी आहे. या कबरीचे ऑनलाईन फोटो प्रसिद्ध झाल्यावर वेगाने व्हायरल झाले आहेत. कारण कबरीवरील शिळेवर जन्म, मृत्यू तारीख आणि मृताचे नाव असा मजकूर बहूतेक वेळा असतो. पण येथे चॉकलेट फजची रेसिपी आहे. कॅथरीनची मुलगी जेनिका सांगते, तिचे वडील हवाई दलात होते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर त्यांचा साखरपुडा झाला होता. लग्न मात्र युद्ध संपल्यावर १९४४ साली झाले. २००० साली जेसिकाच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्या कबरीवर काय स्मृती शिळा लावायची याचा निर्णय कॅथरीनने घेतला होता तसेच तिच्या स्मृतीशिळेवर चॉकलेट फज रेसिपी कोरायची हेही सांगितले होते.
कॅथरीनच्या म्हणण्यानुसार जो ही शिळा पाहिल, त्याच्या चेहऱ्यावर स्मित आले पाहिजे. या शिळेवर एक मेसेज सुद्धा आहे. त्यात म्हटले गेले आहे,’ ती जेथे जेथे जाते, तेथे आनंद वाटते.’ सोशल मीडियावर या पोस्ट वर प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे.