मेहुल चोक्सी केस, नेतृत्व करत आहेत महाराष्ट्र केडरच्या आयपीएस शारदा राऊत

भारतातून अनेक बँकांना गंडा घालून फरारी झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची डोमिनिका उच्च न्यायालयात आज म्हणजे गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. भारत सरकार चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील आहे आणि भारतची एक टीम डोमिनिका मध्ये मुक्काम टाकून आहे. या टीमचे नेतृत्व करताहेत सीबीआय अधिकारी शारदा राऊत. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा तपास राऊत यांच्याकडेच होता आणि आता चोक्सीला भारतात परत आणण्यात त्या महत्वाची भूमिका बजावत आहेत.

विशेष म्हणजे शारदा राऊत महाराष्ट्र २००५ बॅच च्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी पालघर येथे पूर्वी एसपी म्हणून काम केलेले आहे. त्याचबरोबर क्राईम कंट्रोल, नागपूर, मीरा रोड, नंदुरबार, कोल्हापूर आणि मुंबई येथेही त्यांनी काम केले आहे. शारदा राऊत त्यांच्या अन्य सहा सहकारी अधिकाऱ्यांसोबत डोमिनिका येथे मुक्काम टाकून आहेत. चोक्सीचे प्रत्यार्पण केले गेले तर त्याला परत आणण्यासाठी एक जेट तेथे तैनात केले गेले आहे.

न्यायालयासमोर भारताने चोक्सी भारतीय नागरिक आहे आणि २०१८ पासून वॉन्टेड असल्याचे तसेच त्याच्या गुन्हेगारीचे पुरावे सादर केले आहेत. इंडिया टुडे च्या रिपोर्ट नुसार भारताने इंटरपोल रेड नोटीसीनुसार चोक्सीचे प्रत्यार्पण केले जावे अशी मागणी केली आहे. चोक्सीने २०१७ मध्ये अँटीगुआचे नागरिकत्व घेतले असले तरी त्याने भारतीय नागरिकत्व सोडलेले नाही असेही म्हणणे न्यायालयासमोर मांडले आहे.