कबरीमध्ये सापडले जगातील सर्वात जुने सोने

सोने हा मौल्यवान धातू जगात हजारो वर्षांपासून दागदागिने, अलंकार स्वरुपात वापरला जात आहे. जर्मनीतील पुरातत्व विभागाला जगातील सर्वात जुने सोने एका कबरीत सापडले आहे. ही कबर एका २० वर्षाच्या मुलीची असून ती ३८०० वर्षे जुनी असल्याचे समजते. या उत्खननामुळे पुरातत्व तज्ञ टीम खुश झाली आहे. ३८०० वर्षापूर्वीचे शव आणि त्यासोबत वेटोळ्याच्या आकारातील सोन्याची लड त्यांना मिळाली आहे.

हा दागिना कसा बनविला गेला असावा आणि संबंधित मुलगी तो कसा वापरत असावी याबाबत अनेक तर्क केले जात आहेत. ही मुलगी या सोन्याच्या वेटोळ्याचा वापर केस बांधण्यासाठी करत असावी या तर्काला अधिक प्राधान्य मिळाले आहे. या सोन्याच्या लडीत २० टक्के चांदी, २ टक्के तांबे, प्लॅटीनम आणि टीन धातूचे अंश सापडले आहेत.

त्याकाळी सोन्याच्या खाणींचा शोध लागला नव्हता. नदीतून वाहून आलेले सोने गाळ स्वरुपात सापडत असे. मृत मुलगी सधन परिवारातील असावी असाही तर्क केला जात असून या जीर्ण शवाची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत जर्मनीच्या उत्खनन इतिहासात सोन्याच्या दागिन्यांचे पुरावे मिळालेले नाहीत. प्रथमच शवा सोबत सोन्याचा दागिना मिळाल्याने त्याविषयी विशेष कुतूहल आहे.