नाशिकामधील खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांचे मुख्यमंत्र्यांना कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी पत्र


नाशिक : देशासह राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दैंनदिन कोरोनाबाधितांच्या संखेचा आलेख उतरणीला लागला असला, तरी मृतांचा आकडा वाढतच आहे. अशातच कोरोनामुळे सुरु असलेल्या मृत्यूतांडवात रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर्स सध्या हताश झाले आहेत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करा, अशी मागणी नाशिकमधील 172 खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी केली आहे. तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो असल्याचा हताश सूर या डॉक्टरांनी आळवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाशिक मधील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी पत्र लिहिले असून त्यांनी या पत्रात आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे. तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शायकीय रुग्णालयांत दाखल करण्यात यावे, अशी मागणीही या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. अशातच राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही राज्य सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे गेल्या एक ते दीड वर्षांपासून तंतोतंत पालन केले आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी करणे आणि कोरोनाची लागण झालेल्या अनेकांचे प्राण वाचवण्यात आम्ही योगदान दिले आहे. परंतु, आम्ही सर्वजण आता हताश झालो आहोत, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले आहोत. त्यामुळे या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करा. आम्ही आता आमचे जे कोविड केअर सेंटर आहेत, ते बंद करत आहोत.