भारतातील रोजगार नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या PETA वर बंदी लवकरात लवकर बंदी आणावी; अमूलची पंतप्रधानांकडे मागणी


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या पेटा अर्थात पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स आणि भारतातील सर्वात मोठी सहकारी तत्वावर दूध उत्पादन करणारी कंपनी अमूल यांच्यात सुरु झाले वाद आता वाढण्याची शक्यता आहे. भारतातील 10 कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट पेटा या आंतरराष्ट्रीय संस्थेने घातला असून त्यावर लवकरात लवकर बंदी आणावी, अशी मागणी अमूलचे व्हाईस चेअरमन वालमजी हंबाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

पेटाचा वेगन दूध तयार करा हा सल्ला म्हणजे भारतातील सहकारी दूध उत्पादक संस्था संपवण्याचे आणि देशातील रोजगार नष्ट करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप अमूलने केला आहे. पेटाचा अमूलसारख्या मोठ्या दूध उत्पादक संस्थेच्या प्रतिमेला तडा द्यायचा आणि त्या माध्यमातून देशातले 10 कोटी रोजगार नष्ट करायचे हा डाव असल्याचा आरोपही अमूलच्या वतीने करण्यात आला आहे.

अमूल या भारतातील सर्वात मोठ्या सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक कंपनीला एक अजब सल्ला पेटाने दिला आहे. आता गाईच्या दुधाच्या ऐवजी वेगन मिल्क उत्पादनाकडे अमूल या कंपनीने वळावे, त्यातच भविष्य असल्याचे पेटाने एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे.

अमूल कंपनीचे सीईओ आर. एस. सोढी पेटाच्या या पत्राला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, जर गाईच्या दुधाचे उत्पादन अमूल कंपनीने थांबवले तर भारतातील 10 कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? आपल्याला माहिती नाही का बहुतेक दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन असतात. आपल्या सल्यामुळे त्यांचे उपजीविकेचे एकमेव साधन नष्ट होईल. आपल्या परंपरेतच दुधाचा वापर आहे. त्यामुळे वेगन दुधाच्या मागे लागणे योग्य नाही.

वेगन दुधाचे उत्पागन सुरु केल्यास शेतकऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत, उलट यामुळे प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबतील आणि दुधापासून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम देखील होणार नाहीत. भारतात गायींना दूध देण्यासाठी त्रास दिला जातो, त्यांना दुभत ठेवले जाते, जेव्हा त्यांचे शरीर दूध देणे बंद करते, तेव्हा त्यांना कत्तलखान्यात विकले जाते आणि मांस मिळवले जाते, असे पेटा इंडियाचे म्हणणे आहे.