जपान सुद्धा आता चांद्रमोहीम स्पर्धेत

अमेरिका, चीन आणि रशियाच्या चांद्र मोहिम स्पर्धेत जपानने उडी घेतली असून एक छोटा रोबो चंद्रावर पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. पृथ्वीनंतर चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याची स्वप्ने माणूस पाहत आहे आणि त्यात अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि एलोन मस्क च्या स्टारशिप सारख्या खासगी कंपन्या आघाडीवर आहेत. जपान ने सुद्धा आता चंद्र मोहिमेसाठी कंबर कसली असून २०२२ मध्ये चंद्रावर एक रोबो पाठविण्याची तयारी सुरु केली आहे.

त्यासाठी एक अगदी छोटा म्हणजे तीन इंची रोबो बनविण्यात येत आहे. अंतराळ संशोधन संस्था जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (जेएएक्सए) व जपानची रोबो कंपनी आयस्पेसने त्यासाठी एकत्रित काम सुरु केले आहे.

बेसबॉलच्या आकाराचा हा रोबो पाठविण्यासाठी हकुतो आर लँडरचा वापर केला जाणार असून हा रोबो तीन इंची आहे. आयस्पेस लँडर मधून चंद्रावर उतरल्यावर हा रोबो स्वतः चालायला सुरवात करेल. यामुळे चंद्रावर फिरण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबीचा खर्च कमी होणार आहे. भविष्यात असे रोबो महत्वाची भूमिका बजावतील असा दावा केला जात आहे.

सध्या अमेरिका, रशिया आणि चीन हे तीनच देश चांद्र मोहिमा मध्ये कार्यरत आहेत. त्यातील फक्त अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर उतरू शकले आहेत. जपानच्या नव्या रोबोची निर्मिती सोनी, दोशिषा विद्यापीठ आणि जपानी एंटरटेनमेंट कंपनी टोमी यांनी केली आहे. टोमी खास करून रोबो खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. जपानचा रोबो चंद्राबाबत अधिक माहिती आणि फोटो पृथ्वीवर पाठवेल आणि या मोहिमेचा तोच मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.