मेक्सिको मधील गूढ ‘झोन ऑफ सायलेन्स’

जगभरात अनेक देशात विशेष कारणांनी प्रसिद्ध अशा कितीतरी रहस्यमय जागा आहेत. त्यातील एक ठिकाण मिक्सिको सिटी मध्ये असून त्याला ‘ झोन ऑफ सायलेन्स’ असे नाव दिले गेले आहे. येथे अनेक अजब गजब घटना घडतात. मुख्य म्हणजे या ठिकाणी पोहोचले की जगातील कुठलेही, कितीही प्रभावशाली इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद पडते. या भागाला चीहुआहुआ वाळवंट म्हटले जाते आणि त्यातच झोन ऑफ सायलेन्स आहे.

येथे आणखीही काही चमत्कारिक गोष्टी घडतात. त्यामागचे कोडे उलगडलेले नाही. असे सांगतात की या भागात उल्कापिंड पडले आणि तेव्हापासून येथे रेडिओ सिग्नल येत नाही. १९३८ मध्ये येथे एक उल्कापिंड पडला होता आणि १९५४ साली दुसरा उल्कापिंड पडला. तेव्हापासून येथे काही तरी विचित्र घटना घडत आहेत. इलेक्ट्रोनिक उपकरणे येथे का चालत नाहीत याचे संशोधन अमेरिकेने सोडलेले एक टेस्ट रॉकेट कोसळले त्यानंतर सुरु झाले.

या जागी जाऊन वैद्यानिकांनी जेव्हा तपास केला तेव्हा येथे होकायंत्र, जीपीएस चक्राकार फिरतात असे दिसून आले. १९६६ मध्ये या भागाला झोन ऑफ सायलेन्स नाव दिले गेले.

यावेळी एक तेल कंपनी येथे तेलसाठे शोधत होती आणि त्यासाठी ५० किमी परिसरात संशोधन सुरु होते. तेव्हा येथे एकही रेडिओ सिग्नल येत नाही आणि इलेक्ट्रोनिक उपकरणे बंद पडतात हे लक्षात आले होते. पण त्यामागचे कारण अद्यापीही कळलेले नाही.