जगातील सर्वाधिक उंचीवरच्या गावात करोना लसीकरण पूर्ण

समुद्रसपाटीपासून १५०५० फुटावर वसलेल्या हिमाचल प्रदेशातील कोमिक गावात कोविड १९ लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे. जगातील सर्वाधिक उंचावरचे हे गाव आहे. येथील ६० वर्षे वयावरील तसेच ४५ वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस दिला गेला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथे १३० नागरिक आहेत. आता या गावात फक्त बालकांचे लसीकरण होणे बाकी आहे.

लाहोल स्पिती मधील लांगजा पंचायतीत हे खेडे येते. कोमिक आणि किब्बर ही खेडी उंचावर वसलेली आहेत मात्र ती रस्ते मार्गाने बाकी भागाशी जोडलेली आहेत. स्पिती घाटीतील मुख्यालय काजा येथे ४५ वर्षांवरील सर्वाना लसीचा डोस दिला गेला आहे तर ६० वर्षावरील नागरिकांना दोन डोस दिले गेले आहेत. या भागात वर्षातील सहा महिने बर्फ असते आणि त्या काळात येथील तपमान शून्य ते उणे २० डिग्री पर्यंत घसरते.

या भागात एकूण १३ पंचायती आहेत आणि त्यातील १० ना इंटरनेट कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे लॉटरी काढून सोमवारी लसीकरणाचे स्लॉट दिले गेले असे समजते. सोमवारी १८ ते ४४ वयोगटातील ७७ नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला गेला.