चीन मध्ये एक मूल वाढवायचा खर्च १ कोटी रुपये

तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी मिळाली असली तरी वाढत्या महागाईने चीनी जोडपी मुले जन्माला घालण्यास उत्सुक नसल्याचे दिसत आहे. चीन मध्ये एक मूल वाढविण्यासाठी साधारण १ कोटी रुपये खर्च येतो त्याचा हा परिणाम  असल्याचे सांगितले जात आहे. देशातील वृद्धांची वाढती संख्या, तरुण आणि बालक संख्या कमी अश्या अडचणीत सापडलेल्या चीनने वन चाईल्ड पॉलिसी रद्द करून दोन मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली मात्र त्याचा उपयोग न झाल्याने तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली गेली आहे.

चीन मध्ये सरकारी रुग्णालयात बाळंतपण सेवा दिली जाते मात्र अशी हॉस्पिटल कमी असल्याने खासगी रुग्णालयाला प्राधान्य दिले जाते. तेथे गरोदरपणाच्या तपासण्या पासून बाळंतपण होईपर्यंत साधारण १ लाख युआन म्हणजे ११. ५० लाख रुपये खर्च येतो. नंतर घरगुती मदतनीस ठेवण्यासाठी २ लाख खर्च करावे लागतात. शाळा आणि अन्य सुविधा चांगल्या असलेल्या बीजिंगच्या हायडीयन भागात घरांसाठी जागा मिळविणे हे खर्चिक काम आहे.

शांघाई अॅकेडमी ऑफ सोसायटी रिपोर्ट नुसार एका परिवाराला मूल १५ वर्षाचे होईपर्यंत ८,४०,००० युआन म्हणजे साधारण १ कोटी रुपये खर्च येतो. यात फक्त शाळा शिक्षणाचा खर्च ६० लाख रुपये असतो.

येथे कुटुंबाची सरासरी कमाई वार्षिक साडेपाच लाख रुपये असते आणि त्यातील ७० टक्के खर्च मुलावर होतो. महागाई खूप असल्याने एकच मूल असावे असे पालकांना वाटते. येथे बेबी फूड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातून येते. पियानो, चेस, टेनिस अश्या क्लासेसना मुलांना पाठविले जाते कारण येथे स्पर्धा खूप आहे असेही दिसून आले आहे.