मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कडक निर्बंध लागणार?


मुंबई – राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर लावण्यात आलेल्या निर्बंधांमधून आजपासून सूट देण्यात आली आहे. पण ही सूट देण्यात आल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर होणारी गर्दी राज्य सरकारसाठी चिंतेची बाब ठरत आहे. सोमवारी या गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त करत पुन्हा कडक निर्बंधांचा इशारादेखील दिला आहे. दरम्यान त्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील यावर भाष्य केले आहे.

कालच मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे. लोकांनी त्याचे पालन केले पाहिजे. कारण कोणताही निर्णय, कोणतेही संकट एकटे राज्य, महापालिका किंवा केंद्रावर सोडून चालत नाही, त्यासाठी लोकांची साथ हवी आणि त्यांनी ती दिलीच पाहिजे. लोक जर साथ देत नसतील तर वेगळा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्टपणे सांगितले असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राजेश टोपे, मुख्यमंत्री हे सगळे पाहत आणि अनुभवत असून निश्चित याच्यावर तोडगा काढला जाईल, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

मुंबई आणि राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध काहीप्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी ही बंधने अजून उठवलेली नाहीत. कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. पण मुंबईतील आजची गर्दी चिंताजनक आहे. अशीच गर्दी राहिली तर पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईकरांना दिला होता.