स्टेट बँकेने आजपासून बदलल्या कामकाजांच्या वेळा


नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या शाखांचा कार्यकाळ म्हणजे बँकिंग वेळांमध्ये बदल केला आहे. एसबीआय शाखा पूर्वी जिथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू असायच्या, त्याला आता 2 तासांची मुदतवाढ देण्यात आली आहे. बँकेच्या शाखा आता संध्याकाळी चार वाजता बंद केल्या जाणार आहेत.

या निर्णयामुळे एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ते आता त्यांच्या सोयीनुसार बँकेशी संबंधित कामे सकाळी दहा ते सायंकाळी चार दरम्यान करू शकतील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कामाचे तास कमी झाले होते, परंतु आता कोरोनाच्या दररोजच्या प्रकरणांमध्ये बऱ्याच प्रमाणात घट होत आहे आणि सकारात्मकतेचे प्रमाणही कमी झाल्यामुळे बँकेने कामकाजाची वेळ 2 तासांनी वाढविली आहे.

आजपासून एसबीआयमध्ये काम करण्याची नवीन वेळ लागू करण्यात आली आहे. पूर्वी बँकेत सुरू असलेल्या वेळात आजपासून बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही कामकाजाची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 ही होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कामाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ही प्रकरणे कमी होत आहेत, म्हणून बँकेच्या कामकाजाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. बँकेच्या नव्या वेळेसंबंधीची माहिती एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरही दिली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे बँक शाखांमधील कामकाजाचा कालावधी कमी झाला होता. त्यापार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीने यासंदर्भात बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना संक्रमणापासून बँक कर्मचारी आणि ग्राहक दोघांचीही सुरक्षा लक्षात घेता कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत अनेक ग्राहक बँकेत 2 वाजेपर्यंत काम आटोपून निघून जायचे, परंतु त्यांना आता चार वाजेपर्यंत बँकेची कामे करता येणार आहे. तसेच एसबीआयने बँकेच्या कामकाजाची वेळ वाढवल्यामुळे बँकेमध्ये होणारी गर्दीही कमी होणार आहे.