राज ठाकरेंचा गौप्यस्फोट ; अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मागितले होते मनसेकडून तिकीट


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका वेबिनारमध्ये बोलताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिकीट मागितले होते, असा गौप्यस्फोट केला आहे.

मनसेच्या पक्ष बांधणीसाठी तेवढेच चांगले नेते पक्षात हवे असतात, पण मनसेला आजवर अनेक नेते सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेले, याबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी सध्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचे तिकीट मागितले असल्याची माहिती दिली.

अनेक नेते मनसेला सोडून गेले, असे अनेकदा सांगितले जाते. पण जे सोडून गेले त्यांच्या फक्त एका बातमीशिवाय दुसरे काही झाले का? मला एक असे उदाहरण दाखवून द्यावे. माझ्याकडे बघून ते पक्षात आले आणि स्थानिक कारणांमुळे पक्ष सोडून गेले. आता पक्षांतराच्या गोष्टी होत असतात. नुकतेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे नेते भाजपमध्ये गेले. त्यांचे काय झाले?, असा प्रतिसवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

भाजपचे अतुल भातखळकर राज्याच्या २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी तर माझ्याकडे आले होते. त्यांनी मनसेचे तिकीट मागितले होते. नितीन गडकरींना फोन करुन मी त्यांची समजूत काढली होती की असे करू नका. ज्या पक्षात आहात त्यातच काम करत राहिले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.