अँटिलिया स्फोटके प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने बडतर्फ


मुंबई: अखेर मुंबई पोलीस दलातून एनआयएच्या अटकेत असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांना बडतर्फ करण्यात आले आहे. माने हे ॲंटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेण हत्याकांडात बडतर्फ झालेले चौथे पोलीस अधिकारी असून या आधी सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकाराचा वापर करून पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी माने यांना बडतर्फ केले आहे.

सुनिल माने हे ॲंटिलिया स्फोटक प्रकरण उघडकीस आले त्यावेळी गुन्हे शाखा युनिट ८ मध्ये कार्यरत होते. त्यांनी या प्रकरणात वाझेंना मदत केल्याचे समोर येताच त्यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली होती. त्यांचा गुन्ह्यात सहभाग काही दिवसांनी स्पष्ट झाल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली. याप्रकणात अटक झालेल्या सर्व चारही पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील कांदिवली क्राइम ब्रँचचे सुनील माने हे पोलीस निरीक्षक होते. माने यांची दहशतवाद पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी करण्यात आली. मनसुख हिरेण हत्या प्रकरणात अटक झालेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाची पूर्वकल्पना असल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दावा होता.