संभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन


नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण होते. त्यावर राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संयम राखत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरू केला. यावेळी त्यांनी अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर ६ जूनपर्यंत मराठा तोडगा निघाला नाही, तर थेट रायगडावरूनच आंदोलनाची घोषणा होईल, असा इशाराच संभाजीराजे यांच्या कडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर यासंबंधी पाच महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदनही सरकारपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. ते यावर नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

मराठा आरक्षणावर ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, पण त्यानंतर आक्रमक मराठा समाजाला शांत राहण्याचा आवाहन मी केल्यामुळे राज्यात कुठलाही उद्रेक झाला नाही. पण, आता 6 जूननंतर जर आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही, तर थेट रायगडावरून यासंबंधी घोषणा होईल. यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी मिळेल ते वाहन पकडून राज्याभिषेक सोहळ्या दिवशी रायगडावर येण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले आहे.

खरंतर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांवर निर्बंध लादण्यात आलेले असल्यामुळे ६ जूनला मराठा समाज रायगडावर गर्दी करेल का? असा प्रश्न समोर येत आहे. दरम्यान, जर असे झाले तर यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.