मोदी सरकारचा मोठा निर्णय; अखेर सीबीएसईच्या बारावी परिक्षा रद्द


नवी दिल्ली – देशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याची मागणी केली जात होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात ट्विटही केले आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण विचार करून घेण्यात आला आहे. घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. शिवाय हा निर्णय आपल्या तरूणाईच्या सुरक्षेसोबत त्यांच्या भविष्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.

दरम्यान, अ‌ॅड. ममता शर्मा यांनी देशातील कोरोना रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. गुरुवारी म्हणजे 3 जून रोजी सर्वोच्च न्यायालय या संदर्भात अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागून घेतला होता. त्यापूर्वीचं मोदी सरकारने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.