देशातील नवीन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण


नवी दिल्ली – मागील बऱ्याच काळापासून देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सुरु असणारी घट आजही पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला असताना आता मात्र देशातील नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख उतरणीला लागला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशामध्ये 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 13 एप्रिलला देशातील कोरोनाबाधितांची संख्या एवढी कमी होती. ज्यानंतर तब्बल दिवसांनंतर हा आकडा पुन्हा दिसला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 2795 नागरिकांचा मृत्यू झाला. तर, 2 लाख 55 हजार 287 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 27 लाख 80 हजार 58 लसी देण्यात आल्यानंतर लसीकरणाचा एकूण आकडा 21 कोटी 60 लाख 46 हजार 638 वर पोहोचला आहे. एकिकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु असतानाच देशात कोरोना चाचण्यांचा वेगही मंदावलेला नाही. त्यामुळे एकंदर आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत असल्याचे चित्र दिसत आहे.

तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. वाशिम, सांगली, नंदुरबार, यवतमाळ कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार उद्यापासून (1 जून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश आज काढण्यात आला आहे.