भारतीय पोलीस दलाची या वाहनांना अधिक पसंती

भारताला स्वातंत्र मिळाल्यापासून दीर्घ काळ पोलीस, सरकारी जुन्या पुराण्या जीप वापरत असल्याचे पाहण्यात होते मात्र आता पोलीस ताफा वाहनात अमुलाग्र बदल झाला असून पोलीस फोर्स नवीन आधुनिक वाहने स्पेशल किट आणि उपकरणांसह वापरत आहेत. अनेक राज्यात पोलीस विभागाची पसंती विविध प्रकारच्या कार्सना आहे. त्या कोणत्या याची माहिती करून घेणे मनोरंजक आहे.

टोयोटा इनोव्हा या एमपीव्ही ला दिल्ली, एनसीआर, उत्तरप्रदेश, आंध्र, तामिळनाडू पोलिसांची पसंती आहे. पोलीस दलात सर्वाधिक वापरली जाणारी हे एमपीव्ही असून आरामदायी प्रवास आणि एकावेळी सात जणांना प्रवासाची सोय त्यामुळे मिळते. रोजच्या गस्ती साठी याच एमपीव्हीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. महिंद्रची बोलेरो महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, बंगाल, आंध्र, केरळ, कर्नाटक अश्या अनेक राज्यातील पोलीस वापरतात. एसयुव्ही प्रकारातील ही सर्वात लोकप्रिय एसयुव्ही आहे. महिंद्राच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनात हिचा समावेश असून दणकट बॉडी आणि देखभालीला सोपी असल्याने तिला विशेष पसंती मिळते.

मारुती जिप्सी महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा येथील पोलीस विभागात अधिक वापरली जाते. सशत्र दलाची जिप्सीला पहिली पसंती आहे. कारण ही ऑफरोडर आहे आणि कुठल्याही प्रकारच्या रस्त्यावर उत्तम धावते. शिवाय रस्त्यात बिघडली तर अगदी रस्त्याकडेचा मेकॅनिक ती सहज दुरुस्त करू शकतो हे तिचे विशेष.

महिन्द्राची स्कॉर्पियो पंजाब, तेलंगाना, आंध्र पोलिसांकडून अधिक वापरली जाते. मजबुती साठी ती विशेष पसंत केली जाते. आंध्र पोलीस स्कोर्पिओचे मागचे जनरेशन वापरतात, तेलंगाना पोलिसांकडे तिचे लेटेस्ट व्हर्जन आहे तर पंजाब पोलीस पिकअप ट्रक व्हर्जन वापरतात. मारुती एर्टीगा हरियाना, चंदिगढ, मुंबई, बंगलोर पोलिसांची पसंती असून इनोव्हा नंतर दुसरी सर्वाधिक विक्री होणारी ही एमपीव्ही आहे. यातुन सुद्धा सात प्रवासी प्रवास करू शकतात. शिवाय ती कॉम्पॅक्ट असल्याने शहरी वाहतुकीत तिचा चांगला वापर होतो.

टाटा सफारी स्टॉर्म मध्यप्रदेश, झारखंड मध्ये पोलिसांच्या वापरात आहेत. गेली २२ वर्षे बाजारात यशस्वी ठरलेली ही एक मस्त एसयूव्ही आहे. सफारीचे उत्पादन नुकतेच बंद केले गेले आहे कारण बीएस ६ इंधन नॉर्म नुसार ती अपडेट केली गेलेली नाही. मात्र भारतीय सेनेने नुकतीच सफारी स्टॉर्म सेवेत दाखल करून घेतली आहे. आरामदायी आणि दीर्घ प्रवासासाठी हे उत्तम वाहन आहे.