डॉल्फिन रोबो, किंमत १८५ कोटी

माणसांचे, कुत्र्यांचे रोबो आता सर्वसामान्य झाले आहेत. माणसाची रोजची अनेक कामे रोबो सहज पार पाडत असल्याचे दिसते आहे पण अमेरिकेत एक आगळा रोबो तयार केला गेला आहे. डॉल्फिन माश्याचा हा रोबो २५० किलो वजनाचा असून अडीच मीटर लांबीचा आहे. हा रोबो तयार करण्यासाठी १८ दशलक्ष पौड म्हणजे १८५ कोटी रुपये खर्च आला आहे असे समजते.

समुद्री जीवन पार्क मध्ये खऱ्या डॉल्फिनची जागा हा रोबो घेत आहे. मेडिकल ग्रेड् सिलिकॉन पासून बनविलेला हा डॉल्फिन रोबो पाण्यात सहज तरंगतो. दिसायला तो अगदी खऱ्या खुऱ्या डॉल्फिन सारखा आहेच पण तो वागतोही खऱ्या डॉल्फिन सारखा. म्हणजे गर्दी समोर तो खऱ्या डॉल्फिन सारखे खेळ करून दाखवितो.

फ्री विली, डीप ब्लू सी, अवतार, फ्लिपर, अॅनाकोंडा सारख्या चित्रपटासाठी कृत्रिम प्राणी निर्माण करणाऱ्या एनिमेट्रोनिक कंपनीने हा डॉल्फिन तयार केला आहे. त्यामागचा उद्देश तीन हजाराहून अधिक हुशार, स्तनधारी प्राण्यांना माणसापासून मुक्तता मिळावी हा आहे. लॉस एंजेलिस मधील जॉन सी आर्क स्विम स्टेडीयम मध्ये हा रोबो डेले खऱ्या डॉल्फिन प्रमाणे मुलांसोबत पोहतो आहे. अमेरिकेतील ओरलँडो, फ्लोरिडा येथे डॉल्फिन पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक गर्दी करतात असेही समजते.