म्हणून साजरा केला जातो जागतिक दुध दिवस

दुध हे अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. दुध अथवा विविध प्रकारची दुध उत्पादने मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. लहान बाळापासून ते अतिवृद्ध आणि आजारी माणसांपासून ते अगदी स्वस्थ माणसापर्यंत सर्व दुधाचा वापर करत असतात. प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत असलेल्या या सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थाबाबत जनजागृती व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्राच्या खाद्य व कृषी संघटनेने १ जून हा दिवस जागतिक दुध दिवस म्हणून साजरा करण्याची सुरवात २००० सालापासून केली आहे.

या निमित्ताने जगभर विविध कार्यक्रम केले जातात मात्र १ जून २०२१ या जागतिक दुध दिवशी करोनाचा उपद्रव लक्षात घेऊन हे कार्यक्रम सोशल मिडियाच्या माध्यमातून साजरे केले जावेत असे आवाहन केले गेले आहे. दरवर्षी हा कार्यक्रम एक थीम घेऊन साजरा केला जातो. २०२१ साठी पर्यावरण, पोषण, व सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरण यासह डेअरी क्षेत्रात स्थैर्य अशी थीम आहे.

दुध हा शरीर पोषणाचा चांगला स्रोत आहेच पण जगभरात १ अब्जाहून अधिक नागरिकांच्या उपजीविकेचे ते महत्वाचे साधन आहे. दुध आणि दुधापासून बनणारी डेअरी उत्पादने जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्वपूर्ण घटक आहेत. भारतासाठी हा दिवस महत्वाचा कारण जगात मोठे दुध उत्पादन करणारे जे देश आहेत त्यात भारताचा नंबर वरचा आहे.

जगात जेवढे म्हणून मानवी समुदाय आहेत तेथे बालकाचा पहिला आहार दुध हाच असतो. भारतात सुद्धा फार प्राचीन काळापासून दुधाचा वापर आहारात होत आहे. आयुर्वेदाने दुधाचे आठ प्रकार सांगितले आहेत. त्यात गाय, म्हैस, बकरी, उंट, गाढव, घोडी, आणि स्त्री यांच्या दुधाचा समावेश असून यात सर्वात उत्तम दुध म्हणजे मातेचे दुध मानले जाते. मग गाय, बकरी, म्हैस यांच्या दुधाचा क्रमांक लागतो. उंट, गाढव, घोडी यांचे दुध औषध म्हणून वापरले जाते आणि हे सहज उपलब्ध होत नाही.