छत्तीसगड मधील या गावाचे नाव झालेय ’दुध गाव’

आज जगभर जागतिक दुध दिवस साजरा केला जात आहे. भारताच्या छतीसगढ़ राज्यातील एका चिमुकल्या गावाची ओळख देशात ‘दुध गाव’ अशी झाली आहे. अगदी कमी लोकवस्तीच्या  गोडबहाल या गावात आज १०० शेतकरी मिळून दररोज २ हजार लिटर हून अधिक दुधाचे उत्पादन घेत आहेत. हे दुध देशभरातील विविध कंपन्या विकत घेत आहेत. येथील शेतकऱ्यांनी जेवढे महत्व शेतीला दिले आहे तेवढेच महत्व दुग्ध व्यवसायाला दिले आहे.

गावातील शेतकरी सांगतात एक वेळ अशी होती की प्रशासनातील अधिकारी गावात गायी, म्हशी पाळा, त्यांच्या दुधापासून तुम्हाला उत्पन्न मिळेल असे सांगत होते पण त्यावेळी लोकांनी शेतीला अधिक प्राधान्य दिले होते. मात्र गावातील जागरूक शेतकऱ्यांनी प्रशासनाचे ऐकले आणि आज त्याचा परिमाण पाहायला मिळत आहे. १९८९ मध्ये गावातील ११ शेतकऱ्यांनी या व्यवसायाचा पाया घातला आणि आज १०० शेतकरी दुग्धव्यवसायाचा जोड धंदा करत आहेत. रोज ४० लिटर दुधापासून झालेली सुरवात आज २ हजार लिटर वर गेली आहे.

गावात गीर, होस्टन, साहिवाल, जर्सी, जर्सी क्रॉस अश्या अनेक जातीच्या गाई म्हशी आहेत. गावात रोजचे अन्न लाकूड किंवा एलपीजी वर नाही तर घरोघरी असलेल्या गोबर गॅसवर शिजविले जाते. शेतकऱ्यांनी दुध साठवण्यासाठी चिलिंग मशीन्स घेतली आहेत असेही समजते.