चीनच्या ग्वांगदोंग मध्ये पुन्हा करोना प्रवेश

करोनाची उत्पत्ती चीन मधूनच झाली असा आता उघड आरोप होऊ लागला असून ब्रिटन आणि अमेरिका करोना साठी चीनच्या वूहान प्रयोगशाळेकडे संशयाचे बोट दाखवू लागले आहेत. चीन ने करोना मानव निर्मित नाही असे वारंवार सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये पुन्हा एकदा करोना परतला आहे. चीनच्या दक्षिण प्रांतातील ग्वांगदोंग भागात करोना संक्रमित सापडल्यामुळे सोमवार पासून येथे प्रवास बंदी लागू केली असल्याचे समजते.

चीनच्या ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार ग्वांगदोंगची राजधानी ग्वांगझुच्या अनेक भागात लॉक डाऊन लावला गेला आहे. येथे करोनाचे २७ संक्रमित रुग्ण आढळले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असावा असा तर्क आहे. त्यामुळे सरकारने लोकांना घरातच राहा असे आदेश जारी केले आहेत. या शहराची लोकसंख्या दीड कोटी आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार संक्रमण वेगाने पसरू लागल्याने बाजार, पाळणाघरे, मनोरंजन केंद्रे, रेस्टॉरंटस, शाळा बंद केल्या गेल्या आहेत. विमान, रेल्वे, खासगी कार्स मधून रात्री १० नंतर जाणाऱ्या लोकांना ७२ तासातील चाचणी अहवाल देणे बंधनकारक केले गेले असल्याचेही समजते.