देशातील नव्या कोरोनाबाधितांमध्ये घट सुरुच; पण सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर


नवी दिल्ली – आरोग्य मंत्रालयाकडून दर दिवशी जाहीर करण्यात येणाऱ्या कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहता, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. असे असले तरीही कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा हा देशाची अद्यापही चिंता वाढवत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत देशामध्ये 152734 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 3128 नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेच मागील दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा जास्त होता. तब्बल 238000 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

देशात सलग 18 व्या दिवशी नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 30 मे पर्यंत देशात 21 कोटी 31 लाख 54 हजार 129 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. रविवारी 10 लाख 18 हजार लसी देण्यात आल्या. तर दुसरीकडे देशात कोरोना चाचण्यांवरही तितकाच भर देण्यात येत आहे. आतापर्यंत 34 कोटी 48 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. काल कोरोनाबाधितांची संख्या 18 हजारांवर आली आहे. पण पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती. शहरातील कोरोना आटोक्यात आला असला तरी ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे गरजेचे असल्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन नाही, पण निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांतील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन किंवा इतर निर्बंध पुढील पंधरा दिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.