बॉलीवूडच्या सिंघमने मुंबईत खरेदी केला 60 कोटींचा बंगला


देशात कोरोनाच्या दूसऱ्या लाटेने थैमान घातलेले असले तरी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मोठ्या प्रॉपर्टींमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. जान्हवी कपूर, अर्जुन कपूर, हृतिक रोशन, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता बॉलिवूडचा सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अजय देवगणने मुंबईत नवीन बंगला खरेदी केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 60 कोटी एवढी अजयच्या या बंगल्याची किंमत असून त्याचा हा नवा आशियाना मुंबईतील जूहू परिसरात आहे. सध्या शक्ती या बंगल्यात अजय आणि काजोल वास्तव्याला असून त्यांचा हा नवीन बंगला याच घराच्या परिसरात आहे.

5 हजार 310 चौरस फूट परिसरात अजयचा हा बंगला पसरलेला आहे. या वृत्ताला अजय देवगणच्या काही जवळच्या व्यक्तींना दुजोरा दिला आहे. पण त्यांच्या या बंगल्याच्या किंमतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण रिअल इस्टेटशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, याची किंमत 60 कोटी एवढी सांगितली जात आहे.

या बंगल्याची मालकीण पुष्पा वालिया होत्या. रिअर इस्टेटशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, या बंगल्याची किंमत 65-70 कोटी एवढी होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजयने हा बंगला कमी भावात खरेदी केला आहे.

काजोल आणि अजय देवगण गेल्या वर्षभरापासून मुंबईमध्ये नव्या घराचा शोध घेत होते. अखेर त्यांना ते सध्या राहत असलेल्या भागातच हे नवे घरे सापडले आहे. अजयने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीस्थित बंगल्याची डील फायनल केली होती. आणि 7 मे 2021 रोजी अजय देवगण आणि त्याची आई वीणा विरेंद्र देवगण यांच्या नावावर हा बंगला ट्रान्सफर करण्यात आला आहे. अजय देवगणने बंगल्याचा ताबा घेतला असून सध्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. कारण अजय त्याच्या सध्याच्या बंगल्याच्या री-डेव्हलपमेंटसाठी नवीन बंगल्यात शिफ्ट होणार आहे.