मोदी सरकारने उचलबांगडी केलेल्या बंडोपाध्यायांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदाचा राजीनामा देत केला ममतांच्या टीममध्ये प्रवेश


कोलकाताः बंगालचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमधील साठमारीत अखेर आपल्या पदाचा आणि नागरिक सेवेचा राजीनामा दिला आहे. ते राजीनाम्यानंतर ममतांच्या टीममध्ये सहभागी झाले आहेत. केंद्रात बंडोपाध्याय यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. आज ३१ मे रोजी त्यांना दिल्लीत हजर होण्यास केंद्र सरकारने सांगितले होते. पण त्यांनी आता राजीनामा दिला आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांनी ३ वर्षांसाठी त्यांना आपले मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. ममतांनी यातून केंद्राच्या दबावाला झुकणार नसल्याचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान मोदींनी यास चक्रीवादाळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गैरहजर राहिल्या. यावरून केंद्र आणि पश्चिम बंगालमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद लवकर मिटण्याची चिन्ह नाहीत. बंडोपाध्याय यांनी मुख्य सचिव पदाचा आणि नागरि सेवेचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावर कारवाईचे संकेत केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिले आहेत.

बंडोपाध्याय यांच्याविरोधात केंद्राच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊ शकते. दुसरीकडे एच. के. द्विवेदी यांची पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ममता बॅनर्जींनी स्वतः ही माहिती दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय साठमारीवरून केंद्र सरकावर हल्लाबोल केला आहे. हे सूडाचे राजकारण आहे. एवढी क्रूर वागणूक आपण कधीच बघितली नाही. राज्य सरकारच्या मंजुरीशिवाय केंद्र सरकार कुठल्याही अधिकाऱ्याला केंद्रात प्रतिनियुक्ती करू शकत नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. अलपन बंडोपाध्याय हे आज निवृत्त होत असले तरी ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून ३ वर्ष सेवा देत राहतील, असे बॅनर्जींनी सांगितले.

सेवानिवृत्ती बंडोपाध्याय यांनी घेतली आहे. यामुळे ते आता केंद्र सरकारमध्ये सेवा करण्यास उपलब्ध नाही. पण कोरोना संकटाच्या या काळात आम्हाला त्यांची गरज आहे. यास चक्रीवादळ आणि कोरोना संकटामुळे गरीबांसाठी त्यांची सेवा कायम ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेठबिगारांसारखी वागणून देत आहेत.

मोदी सरकारकडून आयुष्यभर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अपमान केला जात आहे. यातून केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना काय संदेश द्यायचा आहे? केंद्र सरकारमध्ये बंगाल कॅडरमधील अनेक अधिकारी आहेत. त्यांना कुठल्याही माहिती न देता बोलावू शकते का? अधिकाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात. पण आम्ही घाबरणार नाही. जे घाबरतात आणि मोडून पडतात. आम्ही लढू आणि जिंकू, असे ममता बनर्जी म्हणाल्या.