भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याविरोधात अभिनेत्री जुही चावलाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका


मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनविरोधात बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तिने याबाबत न्यायालयाचे दारही ठोठावले आहे. आता भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात जुही चावलाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आज त्यावर सुनावणी होणार आहे.

जुही चावलाने दाखल केलेल्या या याचिकेत 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनावर बारकाईने विचार करुन त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर आपल्या या याचिकेत जुही चावलाने भारताच्या दूरसंचार मंत्रालयाला आवाहन केले आहे की, 5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडे-झुडपे आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा.

एबीपी न्यूजला जुही चावलाने सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याच्याविरोधात आम्ही नाही. उलट यामधून निर्माण होणाऱ्या नवनव्या उत्पादनांचा आपण लाभही घेतो, ज्यात वायरलेस कम्युनिकेशनचाही समावेश आहे. परंतु आपण आजही या उपकरणांच्या वापराबाबत गोंधळाच्या स्थितीत आहोत. कारण वायरफ्री गॅजेट्स आणि नेटवर्क सेल टॉवर्सशी संबंधित आपल्याच संशोधनातून हे स्पष्ट होते की अशाप्रकारचे रेडिएशन नागरिकांच्या आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय हानीकारक आहेत.

5G टेक्नॉलॉजी भारतात लागू करण्याआधी RF रेडिएशनमुळे महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले, जनावरे, जीव-जंतू, झाडं-झुडपे आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा योग्यरित्या संशोधन केले जावे. झालेल्या किंवा होणाऱ्या संशोधनाचा अहवाल सार्वजनिक केला जावा. भारताच्या सध्याच्या नागरिकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित आहे की नाही हे या संशोधनानंतर स्पष्ट केले जावे. त्यानंतरच भारतात ही टेक्नॉलॉजी लागू करण्याबाबत विचार करावा, असे जुही चावलाच्या एका प्रवक्त्याने अधिकृत वक्तव्यात स्पष्ट केले आहे.