आपले घर हे केवळ चार भिंतींची इमारत नसून दिवसभराच्या कामाच्या धावपळीने थकल्या भागल्या जीवाला विसावा देणारी अशी वास्तू असते. घर बांधताना किंवा खरेदी करताना ते वास्तूशास्त्रानुसार आहे का? तसेच घराची सजावट करीत असताना वास्तूसाठी शुभ असणाऱ्या वस्तूंचा घरामध्ये आवर्जून समावेश करण्याबाबत आपण जागरूक असले पाहिजे कारण घरामधील वातावरण प्रसन्न असावे, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असावा, घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अस्वास्थ्य, ताणतणाव, आरोग्याशी संबंधित तक्रारी असू नयेत, आर्थिक सुबत्ता नांदावी यासाठी वास्तूशास्त्रानुसार घराची रचना असणे अगत्याचे आहे. पण अनेकदा घाई-घाई मध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे घरामध्ये वास्तुदोष असेल तर अशा वास्तूत नकारात्मक वातावरणाचे संचरण होऊन घरामध्ये सतत लहान मोठ्या अडचणी, आर्थिक नुकसान, तब्येतीच्या तक्रारी उद्भवू लागतात. अशा समस्या टाळण्यासाठी घराची रचना करताना वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या दिशांचे महत्व समजून घेतले पाहिजे. या लेखात वास्तुशास्त्रानुसार घराची रचना करताना विविध दिशांचे काय महत्व आहे, तिथे काय असायला हवे आणि जर वास्तुदोष उत्पन्न होणार असेल तर काय करायला हवे हे स्पष्ट केलेले आहे (Vastu Tips for Home):
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात कोणत्या दिशेला काय असायला हवे?
वास्तुशास्त्रातील महत्वाच्या ८ दिशा: (8 Directions of Vastu Shastra): प्रत्येक दिशेचा स्वतःचा स्वामी असतो, म्हणजेच वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेचे प्रतीक असलेले देवता आणि ग्रह सांगितले गेले आहेत. जर दिशा लक्षात न घेता वास्तूची रचना करण्यात आली, तर या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता उद्भवते. म्हणूनच वास्तूची रचना करताना आणि घरामध्ये वस्तूंची मांडणी करताना दिशा लक्षात घेणे अगत्याचे ठरते.
पूर्व दिशा: पूर्व दिशेचा स्वामी सूर्य असून, इंद्र या दिशेचे देवता आहेत. त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असणे शुभ मानले गेले आहे. घराचे द्वार जर पूर्वोत्तर दिशेला असेल, तर अशा वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभते. घरामध्ये पूर्वेला बाथरूम असू नये. तसेच घराच्या पूर्वेला घरामधील उजेड अडेल अशी वस्तू नसावी. (उदा. एखादे मोठे झाड, किंवा भिंत). जर आपल्या घरामध्ये दिशेला अनुसरून एखादा वास्तूदोष असलेच आणि तो हटविता येणे अशक्य असेल, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, गायीच्या दुधापासून तयार केलेल्या साजूक तुपामध्ये कुंकू कालवून त्याने प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला स्वस्तिकाचे चिन्ह काढावे. तसेच घराच्या प्रवेशद्वाराजवळ फुलझाडे लावावीत.
आग्नेय दिशा: शुक्रदेव ऐश्वर्याचा स्वामी असून, घरामध्ये सुख-शांती, संपन्नता प्रदान करणारा आहे. आग्नेय दिशेचा हा स्वामी असून, ज्यांच्या वास्तू आग्नेय दिशाभिमुख आहेत अशा वास्तूंमध्ये राहणाऱ्या महिलांचे आरोग्य उत्तम असते. या घरामध्ये धनधान्याची कमतरता होत नाही. जर अशा वास्तूमध्ये काही कारणाने वास्तूदोष उत्पन्न झाला, तर या दिशेला तुपाचा दिवा नेमाने प्रज्वलित केला जावा असे वास्तूशास्त्र सांगते. तसेच घराच्या या दिशेला एखादे फुलझाड लावणेही शुभफलदायी ठरते.
दक्षिण दिशा: दक्षिण दिशेचा स्वामी मंगळ असून, या दिशेचा देवता यम आहे. ही दिशा जरी स्थिर मानली गेली असली, तरी जर मंगळ शुभफलदायी नसेल, तर दक्षिण दिशाभिमुख वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत सतत काही ना काही आर्थिक अडचणी, तब्येतीच्या तक्रारी उद्भवत असतात. घराच्या या दिशेला जर वास्तुदोष आढळून आला, तर हा दोष नाहीसा करण्यासाठी या दिशेला खिडकीवर किंवा दरवाजावर एक लहानसा त्रिकोणी झेंडा लावावा. या दिशेला घरातील अडगळ ठेऊ नये.
नैऋत्य दिशा: नैऋत्य म्हणजेच दक्षिण-पश्चिम दिशेचा स्वामी राहू असून, ही दिशा आयु आणि यश प्रभावित करणारी आहे. अचानक भय उत्पन्न करणारा असा या दिशेचा प्रभाव समजला जातो. तसेच जीवनात अचानक येणारे उतारचढावही या दिशेच्या परिणामस्वरूप येत असतात. नैऋत्य दिशाभिमुख घर कधीही फार काळ बंद किंवा रिकामे राहू नये. या घरातील पाण्याची टाकी देखील नियमित स्वच्छ केली जावी. यामुळे वास्तुदोष निर्माण होत नाहीत.
पश्चिम दिशा: शनी पश्चिम दिशेचा स्वामी असून, वरूण या दिशेचे देवता आहेत. ही दिशा भाग्य, पौरुष, कर्म आणि यशासंबंधी कार्याची कारक आहे. जर या वास्तूमध्ये शनीचा प्रभाव शुभ नसेल, तर वास्तूदोष निर्माण होऊ शकतात. वारंवार असफलता मिळणे, घरामध्ये अशांती, इत्यादी समस्या यामुळे उद्भवू लागतात. हे वास्तूदोष दूर करण्यासाठी घरामध्ये धार्मिक ग्रंथांचे वाचन नेमाने केले जावे.
वायव्य दिशा (उत्तर-पश्चिम): वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेचा कारक चंद्र असून, वायू या दिशेचे देवता आहेत. जर चंद्राचा प्रभाव शुभ असेल तर घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदते. जर चंद्र अशुभ फल देणारा असेल तर घरामध्ये नेहमी मानसिक तणाव पाहावयास मिळतो. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी एका खोल पात्रामध्ये पाणी भरून त्यामध्ये फुले घालून ठेवावीत. ही फुले आणि पाणी दररोज बदलले जावे. दुधाच्या दानानेही हा वास्तुदोष दूर होत असल्याचे वास्तूशास्त्र सांगते.
उत्तर दिशा: उत्तर दिशेचा कारक बुध असून कुबेर या दिशेचे देवता आहेत. जर बुध शुभफलदायी असला, तर घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहते. मात्र बुध लाभणारा नसेल तर घरामध्ये मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणी येऊ लागतात. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ फुलांच्या वेली लावाव्यात. तसेच कोणत्याही मोठ्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी गुरुजनांची परवानगी घेतली जावी.
ईशान्य दिशा: ईशान्य दिशेचा स्वामी बृहस्पती असून, विष्णू या दिशेचे देवता आहेत. आध्यात्मिक उन्नती प्राप्त करून देणारी, ज्ञान प्रदान करणारी आणि मानसन्मानामध्ये वृद्धी करणारी अशी ही दिशा आहे. जर या वास्तूमध्ये ग्रहाचे अशुभ फल असेल तर वास्तुदोष निर्माण होतात. हे टाळण्यासाठी ईशान्य दिशाभिमुख घरामध्ये धार्मिक कार्ये नेमाने केली जावीत. तसेच घराचे मुख्य प्रवेशद्वार शोभिवंत केलेले असावे.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या सभोवताली असणाऱ्या झाडांचे शुभ-अशुभ परिणाम: वास्तूचे शुभ-अशुभ परिणाम केवळ घराची संरचना कशी आहे किंवा घरामध्ये कुठल्या वस्तूची मांडणी कशी आणि कुठे केली आहे यावरच अवलंबून नसून, घराच्या आसपास, अवती-भोवती कुठल्या वस्तू आहेत यावरही अवलंबून असतात. आपल्या घराला सुंदर बनविण्याच्या दृष्टीने आपण घरामध्ये किंवा बाहेर बागेमध्ये अनेक झाडे लावत असतो. यांचे देखील शुभ-अशुभ परिणाम आपल्या घरावर होत असतात.
शुभ झाडे: मनी प्लांट सारखे झाड घरामध्ये वास्तूशास्त्रात निर्देशित केलेल्या दिशेकडे लावले, तर ते शुभ परिणाम देणारे ठरते. तसेच तुळस, पारिजातक, उंबर ही झाडे घराच्या आसपास असणे शुभ मानले गेले आहे.
अशुभ झाडे: घराच्या ईशान्येला आणि पूर्वेला उंच झाडे असणे अशुभ मानले गेले आहे. तसेच घराच्या परिसरामध्ये अर्धवट वठलेली, वाळलेली, किंवा अर्धवट जळलेली झाडे असणेही अशुभ मानले गेले आहे. अशी झाडे घराच्या अवती भोवती असल्याने घरामध्ये नकारात्मक उर्जेचा संचार होत असल्याचे वास्तूशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. त्याचप्रमाणे घराच्या आसपास ताड, कापूस अशी झाडे असल्यास घरामध्ये कलह उत्पन्न होण्याची शक्यता असते. चिंच किंवा मेहेंदीची झाडे घराच्या प्रवेश द्वारापाशी असू नयेत.
काय करावा उपाय? जर ही झाडे आपल्या घराच्या आसपास असतील, तर त्या झाडांच्या भोवताली तुळस, अशोक, हळद, कडूनिंब, नागकेशर अशी झाडे लावून या झाडांची नकारात्मक ऊर्जा कमी करता येऊ शकते.