रोल्स रॉईसची बोटटेल लग्झरी कार, किंमत फक्त २०५ कोटी रुपये

जगात प्रीमियम लग्झरी कार्ससाठी प्रसिध्द असलेल्या रोल्स रॉईसने जगातली सर्वात महागडी बोट टेल लग्झरी कार लाँच केली असून या मॉडेलच्या फक्त तीन कार्स बनविल्या जाणार आहेत. २०२१ रोल्स रॉइस बोट टेल नावाने ही कार सादर केली गेली आहे. या कारची किंमत २० दशलक्ष पौंड म्हणजे २०५ कोटी रुपये आहे. याचा सरळ अर्थ असा की या किमतीत रोल्स रॉईसच्या महागड्या फँटम लीमोसीन सारख्या ४० कार्स खरेदी केल्या जाऊ शकतात.

या कारची प्रेरणा रोल्स रॉइस स्वेफ्ट टेलवरून घेतली गेल्याचे सांगितले जात आहे. हे एकमेव मॉडेल लग्झरी कार निर्माता रोल्सने २०१७ मध्ये १२.८ दशलक्ष पौंड म्हणजे १३२ कोटी रुपयांना विकले होते. २०२१ बोट टेलची बात करायची तर यात इतक्या खुब्या आहेत की कुणी त्याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही. पहिल्या रोल्स रॉइस बोट टेल २०२१ ची खरेदी केलेल्या ग्राहकाचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. हा ग्राहक अमेरिकेतील एक प्रसिद्ध रॅपर असल्याचे समजते.

बोट टेल चा मागचा भाग जे क्लास रेसिंग याट सारखा आहे. नॉटीकल थीम वर कारचे रिअर डेक पिकनिक सेट मध्ये बदलले जाते. फुलपाखराच्या पंखाप्रमाणे ते उघडते. त्यात डिनर सेट, चेअर्स, शँपेन फ्रिजर, कटलरी, ओव्हन असून ही फोर सिटर कार आहे.

या अलिशान कारची लांबी १९ फुट आहे. तिला ६.७ लिटर पेट्रोल इंजिन असून ० ते १०० किमीचा वेग ती ५ सेकंदात घेते. इंटिरीअर लेदर आणि वूडन फिनिशचे आहे. ही कार हाताने बनविण्यासाठी कामगारांना चार वर्षे लागली आहेत.