बोरीस जॉन्सन यांचा विवाह संपन्न, ट्रेन पकडतानाचा व्हिडीओ व्हायरल

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा २८ में रोजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे २९ में रोजी जॉन्सन आणि त्यांची गर्लफ्रेंड कॅरी सायमंड यांनी लंडनच्या रोमन कॅथोलिक वेस्टमिन्स्टर कॅथेड्रल मध्ये गुपचूप विवाह उरकल्याचीही चर्चा आहे. हा विवाह इतका गुप्तपणे केला गेला की जॉन्सन यांच्या कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याची माहिती नव्हती असे समजते.

वेगाने व्हायरल झालेल्या बोरीस यांच्या १८ सेकंदाच्या व्हिडीओ क्लिप मध्ये बोरीस सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे धावत पळत ट्रेन पकडताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सुरक्षा अधिकारीही आहेत. करोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळून बोरीस धावत आहेत. त्याच वेळी एका महिलेने केलेल्या अभिवादनाचा स्वीकार ते हात हलवून करताना दिसत आहेत. पंतप्रधान पदावर असतानाही स्वतःला उशीर झाला म्हणून ट्रेन थांबविण्याचा विचार न करता बोरीस सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे पळत जाऊन ट्रेन पकडत असल्याचे दिसल्यावर त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

दुसरीकडे या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी बोरीस यांचा विवाह पार पार पडल्याची बातमी आहे. बोरीस त्यांची गर्लफ्रेंड कॅरी हिच्याबरोबर ३० जुलै २०२२ मध्ये विवाह करणार असल्याचे सांगितले जात होते. या दोघांचा साखरपुडा २०१९ मध्ये झाला आहे. बोरीस २०१९ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून हे दोघे एकच घरात राहत असुन त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. बोरीस यांची या पूर्वी दोन लग्ने झाली होती मात्र त्यांनी घटस्फोट घेतला होता. २०१९ मध्येच बोरीस यांनी कॅरीला प्रपोज केले होते आणि त्यानंतर ते लगेच पंतप्रधान झाले होते.

विशेष म्हणजे कॅरीने विवाहप्रसंगी २८५० पौंड किंमतीचा वधूवेश परिधान केल्याची चर्चा आहे. मात्र हा वधूवेश कॅरी यांनी ४५ पौंड भाडे भरून तात्पुरत्या वापरासाठी आणला होता असेही समजते.