भारताच्या फर्स्ट लेडीला सुद्धा मिळते वेतन

भारतीय घटनेनुसार राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च पद असून भारताचे राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक असतात हे आपल्याला माहिती आहे. सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात. त्यामुळे राष्ट्रपतींना वेतन आणि अन्य सुविधाही त्याच तोलाच्या दिल्या जातात यात नवल नाही. मात्र अनेक नागरिकांना राष्ट्रपतींच्या पत्नी म्हणजे फर्स्ट लेडीला सुद्धा सरकारकडून वेतन दिले जाते याची माहिती नसेल.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार राष्ट्रपतींच्या पत्नीला दरमहा ३० हजार रुपये वेतन दिले जाते. सेक्रेटरियल असिस्टंट म्हणून हे वेतन दिले जाते आणि राष्ट्रपती निवृत्त झाल्यावर सुद्धा राष्ट्रपतींच्या पत्नीला देण्यात येणारे वेतन सुरु राहते.

२०१६ पासून राष्ट्रपतींच्या वेतनात बदल केला गेला असून हे वेतन आता दरमहा ५ लाख रुपये आहे. त्यावर कोणताही कर आकारला जात नाही. राहण्यासाठी राष्ट्रपती भवन, सर्व वैद्यकीय सुविधा त्यांना दिल्या जातात आणि या सुविधा निवृत्तीनंतर सुद्धा सुरु राहतात. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर १.५ लाख रुपये निवृत्तीवेतन मिळते, राहण्यासाठी मोफत बंगला दिला जातो आणि स्टाफ खर्चापोटी दरमहा ६० हजार रुपये दिले जातात.

देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींना १० ते १५ हजार रुपये वेतन दिले जात होते. त्यात वेळोवेळी बदल होत गेले. १९९८ मध्ये हे वेतन ५० हजार रुपये, २००८ मध्ये दीड लाख रुपये तर २०१६ पासून पाच लाख रुपये झाले आहे.