चीनी लष्करात लाखो पदे रिक्त, सेना अडचणीत

चीन देशाची प्रगती अति वेगाने होत असली तरी काही बाबतीत ही प्रगती समस्या बनून समोर आली असल्याचे दिसून येऊ लागले आहे. चीनी तरुणांमध्ये जनन क्षमता वेगाने कमी होत आहे, नवीन बालकांचे जन्म कमी होत आहेत आणि त्यामुळे चीनी लष्कर हैराण झाले आहे. जगातील सर्वात मोठी सेना अशी चीनची ख्याती आहे. मात्र आज या खात्यात लाखो पदे रिक्त असल्याने चीनी लष्कर अडचणीत आले असल्याचे सांगितले जात आहे.

चीन मध्ये गेली काही दशके वन चाईल्ड पॉलिसी राबविली गेली होती. त्यामुळे मुळात युवक संख्या कमी झाली आहे आणि ही संख्या दरवर्षी कमीच होत आहे. जनगणनेच्या आकडेवारी नुसार २०२० मध्ये फक्त १ कोटी २० लाख बालके जन्माला आली. १९६१ नंतर ही संख्या सर्वात कमी आहे. आता दोन मुलांना जन्माला घालायची परवानगी सरकारने दिली असली तरी त्याचे परिणाम इतक्यात दिसणार नाहीत.

चीनी सेना तज्ञ अँटनी वोंग कॉंग म्हणतात, १९९३ पासूनच सेनेने वन चाईल्ड पॉलिसी बद्दल चिंता व्यक्त करायला सुरवात केली होती. तेव्हापासून चीन सेनेत रिक्त पदांची संख्या वाढत आहे. आता ती लाखोवर गेली आहे. सध्याच्या सेनेतील ७० टक्के सैनिक वन चाईल्ड पॉलिसी परिवारातून आलेले आहेत. मोर्च्यावर प्रत्यक्ष युद्धात लढणाऱ्यात हे प्रमाण ८० टक्के आहे. याचा विपरीत परिणाम सैनिकांच्या मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे पाश्चात्य लष्कराप्रमाणे चीनी सेनेत महिला सैनिकांची भरती करण्याचा विचार गंभीरपणे केला जात आहे.