या आहेत उत्तम ‘पे पॅकेज‘ देणाऱ्या शासकीय सेवा


आजकाल खासगी क्षेत्रांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीची ‘पे पॅकेज’ भरघोस असतात. त्यामुळे शासकीय सेवेपेक्षा, खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांकडे वाढता कल दिसून येतो आहे. पण काही शासकीय सेवांमध्ये खासगी क्षेत्रातील पे पॅकेज पेक्षा जास्त चांगली पे पॅकेज आहेत. अश्या काही शासकीय सेवांबद्दल जाणून घेऊ या.

सिव्हील सर्व्हिसेस (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस इत्यादी सेवा ) मधील सेवा प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून, ह्या सेवेमध्ये असणाऱ्यांचे वेतन उत्तम असते. एका आयएएस अधिकाऱ्याला दर महिन्याला सुमारे २.१८ लाख रुपये वेतन मिळते. या मध्ये त्यांना मिळत असलेल्या निरनिराळ्या भत्त्यांचा देखील समावेश आहे. त्याशिवाय राहण्यासाठी सरकारी आवास, वाहन इत्यादींची सुविधाही मिळते. ह्या सेवेमध्ये रुजू होण्यासाठी यूपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश आणि पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते.

पीएसयु क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये देखील वेतन चांगले आहे. या क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आवास आणि वैद्यकीय सुविधा आहेत. कोल इंडिया लिमिटेड सारख्या पीएसयू क्षेत्रातील कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी सुमारे दहा ते बारा लाख रुपये वेतन प्राप्त होते. तसेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सारख्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी सुमारे आठ ते दहा लाख रुपये वेतन मिळते.

आपल्या देशातील सरकारी वैज्ञानिक केंद्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या वैज्ञानिकांना देखील उत्तम वेतन दिले जाते. या सेवेमध्ये प्राथानिक पातळीवर काम करीत असलेल्या वैज्ञानिकांना एस अँड एसडी ग्रेड अंतर्गत महिन्याला साठ हजार रुपये वेतन दिले जाते. तसेच याच्या जोडीला निरनिराळे भत्ते देखील दिले जातात. स्तर आणि अनुभव वाढत जाईल तसे वेतन ही वाढत जाते. ठिकठीकाणी बदल्या होत असल्याने आवसाची सुविधाही दिली जाते.

शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्सना देखील चांगले वेतन मिळते. या व्यवसायामध्ये इंटर्नशिप करीत असणाऱ्या नवख्या डॉक्टर्सना महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये स्टायपेंड मिळतो. तसेच शासकीय रुग्णालयामध्ये काम करिता असणाऱ्या वरिष्ठ डॉक्टर्सना महिन्याला ऐंशी ते नव्वद हजार रुपये वेतन मिळते. अनुभव आणि पदोन्नतीबरोबर वेतनांत वाढ होते. निरनिराळ्या विद्यापीठांमध्ये किंवा सरकारी कॉलेजांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना दर महिन्याला ऐंशी ते नव्वद हजार रुपये वेतन मिळते.

Leave a Comment