काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच सुरु आहे देशाचा कारभार – संजय राऊत


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कामगिरीवर टीका करताना काँग्रेसचे सरकार असताना झालेल्या कामामुळेच देशाचा कारभार सुरु असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना देशासाठी अजून बरच काही करणे बाकी असल्याचे म्हटले आहे. तसेच नवीन काही झालेले नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो, असेही म्हटले आहे.

सरकारने राहुल गांधी यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले पाहिजे. कोरोनामध्येच सरकारची दोन वर्षे तर निघून गेली. देशासाठी अजून बरच काही करणे बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच्या पुण्याईवर देश चालत आहे. नवीन काही झालेले नाही पण आपण अपेक्षा करु शकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना, प्रकल्प दिसत आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धा…हे कोणालाही नाकारता येणार नसल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

लोक सरकार निवडून देत असतील तर लोकांचा विश्वास आणि बहुमत मिळालेले आहे. पण देशात आजही महागाई, बेरोजगारी आहे. कोरोनानंतर पसरलेली अराजकता कायम आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात, प्रत्येकाला अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला व्हायचे नाही. फक्त रोजगार, रोजी रोटी मिळायला हवी. सात वर्षात देशातील जनतेला हे मिळाले का याचे चिंतन करायला हवे, असा सल्ला संजय राऊतांनी मोदी सरकारला दिला आहे.

मोदींकडे उत्तम नेतृत्वक्षमता आहे. आजही त्यांच्याकडून आपण ते देशाला योग्य दिशा, मार्ग दाखवतील अशी अपेक्षा करु शकतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत. पश्चिम बंगाल आणि केंद्रातील संघर्ष कायम आहे. केंद्र सरकार राज्यांचे मायबाप असते. एखाद्या राज्यात एखादे सरकार निवडून आले असेल, तर त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी केंद्राची असते. त्यामुळे केंद्राने जुन्या गोष्टी, राजकीय मतभेद विसरुन राज्य सरकारला आपल्या मुलाप्रमाणे जपण्याचं दायित्व केंद्राचे असते.

ममता बॅनर्जी यांचे म्हणणं दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. मोदींनी वादळाचा फटका बसलेल्या अनेक राज्यांचा दौरा केला. पण फक्त पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षनेत्यांना बोलावले ही गोष्ट खटकणारीच आहे. ममता बॅनर्जी यांनी मुद्दा उचलला असून मोदींनी त्यावर विचार करणे गरजेचे असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दौरा मोदींनी न करण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, सरकारने स्वत: वाद उकरुन काढू नयेत. नरेंद्र मोदी देशाचे नेते असून प्रत्येक राज्याला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. तुम्ही देशाचे सर्वोच्च नेते असून लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे केंद्राने आपण सर्व राज्यांचे पालक आहोत अशा भूमिकेतूनच पहायला हवे.