बटाटे, जरा जपूनच…


बटाटे आपल्या शरीराला कितपत उपयोगी पडतात आणि ते खावेत की नाही, खायचे असतील तर किती खावेत हा नेहमीचाच चर्चेचा विषय असतो आणि या संबंधात परस्पर विरोधी मते व्यक्त केली जात असतात. बटाटे खाल्ल्याने वजन वाढते असे पूर्वी बोलले जायचे. परंतु आता हा समज दूर झालेला आहे. बटाटे वजन वाढवत नसून कर्बोदकांनी भरलेली असतात आणि त्यातील कर्बोदके लवकर पचन होतात, असे काही लोक सांगत आहेत. मात्र आता अलीकडेच बटाट्याविषयी जो नवा शोध पुढे आला आहे त्यानुसार बटाटे आपल्या अन्नात असता कामा नयेत. परंतु बटाटे खाल्लाशिवाय पर्यायच नसेल तर काही पथ्ये पाळून ती खाल्ली पाहिजेत. ही पथ्ये न पाळल्यास बटाटे आपल्यासाठी फार घातक ठरू शकतात. कारण त्यातून सोलॅनाईन हे मेंदूला घातक ठरणारे द्रव्य निर्माण होते.

सोलॅनाईन आपल्या पोटात भरपूर गेले तर आरोग्याला धोका पोहोचू शकतो आणि ते कोणत्या परिस्थितीत निर्माण होते याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. बटाटे घरात आणून तसेच ठेवून दिले जातात. किंबहुना धान्यासारखे बटाटे घरात ठेवून दिले जातात आणि यथावकाश कधीही वापरले जातात. पण तज्ञ मंडळी आता असा इशारा देत आहेत की बरेच दिवस ठेवून दिलेले बटाटे वापरले तर ते आपल्या शरीरामध्ये काही विषारी द्रव्यांची निर्मिती करतात. कधी कधी असे बटाटे सुरूकुतून जातात तर काही वेळेला बटाट्यांची वरची साल खराब झालेली दिसते. अशा परिस्थितीतले बटाटे उन्हात राहिले तर त्यांच्यामध्ये सोलॅनाईन मोठ्या प्रमाणावर निर्माण होते.

कधी कधी बटाटे इतके दिवस साठवले जातात की त्यांना मोड येतात. असे मोड कापून फेकले तर उर्वरित बटाट्यातील पोषणद्रव्ये आहे तशीच राहतात. मात्र सुरकुतलेले बटाटे तसे राहत नाहीत. तेव्हा हे बटाटे फेकून दिलेले बरे. काही वेळा बटाटे हिरवे पडतात. अशा वेळी ते जर उन्हाला उघडे राहिले तर त्यातही सोलॅनाईन तयार होते. मात्र असे हिरवे झालेले बटाटे या कारणाने फेकून देण्यापेक्षा त्यांचा हिरवा झालेला भाग कापून फेकावा. मग काही नुकसान होत नाही. एकंदरीत बटाटे खाण्याचे पूर्णपणे टाळता येत नाही. काही पथ्ये पाळून ते खाल्ले तर ते नक्कीच कमी घातक ठरतात. बटाट्यांमध्ये अशा परिस्थितीत विशेषतः मोड येण्याच्या परिस्थितीत चाकोनाईन या नावाचे एक विषारी द्रव्य तयार होत असते. तेव्हा त्याचीही दखल घेणे चांगले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment