राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम!; प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यातील निर्बंध शिथील; उद्धव ठाकरेंची घोषणा


मुंबई : आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. आज कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. मात्र पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती. ग्रामीण भागात आता कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. तर, राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी उद्या संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखे दुसरे कटू काम नाही, असे मला वाटत नाही. पण ते मला नाईलाजाने करावे लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावे लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले.

तसेच, सुरूवातीला त्यांनी, जिद्दीने आणि निश्चयाने बंधने पाळल्याबद्दल धन्यवाद.. असे म्हणत जनतेचे आभारही मानले. याचबरोबर, आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नसल्याचेही ते म्हणाले. याशिवाय, तोक्ते वादळग्रस्तांना मदत देण्यास सुरूवात होत असल्याचेही सांगितले.

आता कोरोनाच्या परिस्थितीत फरक दिसत आहे पण म्हणावे तितके आकडे खाली आलेले नाहीत. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चालली असली तरी गेल्या वेळच्या सर्वोच्च संख्येच्या जवळ आपण आता आलो आहोत. दुसऱ्या लाटेतील कोरोना झपाट्याने पसरत असल्यामुळे कडक लॉकडाऊन नाही, परंतु निर्बंध कायम राहणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव अजूनही वाढत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अन्न सुरक्षा योजनेत सरकारने आतापर्यंत 2 लाख 74 हजार मेट्रिक टन धान्याचे मोफत वाटप केले आहे. शिवभोजन योनजेअंतर्गत एकूण 54 ते 55 लाख थाळ्यांचे मोफत वितरण केले आहे. संजय गांधी निराधार, दिव्यांग निवृत्ती, विधवा निवृत्ती वेतनमध्ये 850 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. बांधकाम कामगारांना 155 कोटी रुपयांची मदत केली आहे. फेरीवाल्यांसाठी साधारण 52 कोटींची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

पहिल्या लाटेत वृद्ध नागरिक, दुसऱ्या लाटेत युवा व मध्यमवयीन नागरिकांना जास्त लागण झाली. हे परिमाण धरले तर पुढची लाट बालकांमध्ये येऊ शकते, असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घ्यायला हवी. राज्यात 45 वरील लसीकरणाची जबाबदारी केंद्राने घेतली आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांची जबाबदारी राज्याची आहे आणि आपले राज्य समर्थ आहे. एकरकमी 12 कोटी लसी घेण्याची राज्याची तयारी आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थोडे स्थगित करावे लागले, लवकरच आपण ते जोमाने सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तिसरी लाट कदाचित बालकांमध्ये य़ेऊ शकेल. त्यामुळे बालकांच्या डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान रोगप्रतिकारक क्षमता बालकांमध्ये असते. लहान मुलांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात. डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केला आहे. संपूर्ण सज्जता करत आहोत. सर्व सोयीसुविधा करत आहोत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आपले राज्य सुरक्षित राहायला हवे, गोरगरिबांची आबाळ व्हायला नको. निर्बंध लादावे लागतात. हे वाईट काम असून स्वत:च्या जनतेवर निर्बंध लादणे यासारखं कटू काम करावे लागत आहे. म्हणून वादळाचा धोका थोडक्यात निभावला. मी वादळ येण्याआधीपासूनच आढावा घेत होतो. नुकसान किती झाले याची कल्पना आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

वादळग्रस्त भागाचा मी धावता दौरा केला आहे. घरावर झाडे पडली होती, वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रत्यक्ष मदत द्यायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत मदतीसंदर्भात निकषांवर चर्चा झाली होती. हे निकष बदलायला हवेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

संकटे वारंवार येणार असतील तर काही ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. बंधारे, भूमिगत तारांचे वहन, भूकंपरोधक घरे, पक्के निवारे यासारख्या उपाययोजनांसंदर्भात काम सुरू असून केंद्र सरकार मदत करेल, अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

तसेच केंद्राने ४५ च्या वरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. तर त्या खालच्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्याची आहे. एकरकमी लसीचे पैसे देण्याचीही आपली तयारी आहे. आपण चोवीस तास लसीकरण करू. आपली क्षमता आहे. परंतु त्याला मर्यादा आहे. लसीची उत्पादन क्षमता तितकी झालेली नाही.

जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले होते. जशा लसी येतील त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढवणार आहोत. सव्वादोन कोटी नागरिकांना आपण लसीकरण केले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लवकरच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.