हे आहेत ‘वन मॅन’ कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स

projects
कोणत्याही प्रकारचे औपचारिक प्रशिक्षण न घेता काही व्यक्ती अशी काही कामगिरी करून दाखवितात, की पाहणाऱ्याने आश्चर्याने थक्क होऊन जावे. अश्या कलाकारांना ‘आउटसायडर आर्टिस्ट’ म्हटले जाते, आणि त्यांनी निर्माण केलल्या कलाकृतीला ‘आउटसाईड आर्ट’ म्हटले जाते. अनेक कलाकारांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृतींचे निर्माण केले. त्यामध्ये काही व्यक्ती अश्याही होत्या ज्यांनी आपल्या स्वतःच्या घराची कल्पना सत्यामध्ये उतरविण्यासाठी स्वतःहूनच परिश्रम करीत स्वतःच्या हिम्मतीवर आपले स्वप्नातील घर प्रत्यक्षात उतरविले.
projects1
दक्षिण कोलोराडो मधील राज्यमहामार्ग १६५ वरील ‘बिशप कासल’ जिम बिशप याने बनविले आहे. केवळ पंधरा वर्षे वय असताना जिमने हा भूभाग ४५० डॉलर्स देऊन, तेथे घर बनविण्यासाठी खरेदी केला होता. या घराच्या निर्माणासाठी जिमने बांधकाम सुरु केले असता, हे बांधकाम एखाद्या बैठ्या घराप्रमाणे न दिसता एखाद्या राजवाड्या प्रमाणे दिसत असल्याचे सर्वांचे म्हणणे पडले. त्यामुळे बैठे घर बांधण्याच्या ऐवजी राजमहालाच उभा करण्याचा निर्णय घेत जिमने चाळीस वर्षांच्या कालावधीमध्ये थोडे थोडे करुन या राजमहालाचे बांधकाम पूर्ण केले. या करिता जिमला तब्बल १००० टन लहान मोठ्या खडकांचा वापर करावा लागला.
projects2
बेल्जियन बांधकाम व्यावसायिक रॉबर्ट गार्सेट याने स्वतःच्या मेहनतीने टॉवर ऑफ एबेन-एझर’चे निर्माण केले. १९५१ ते १९६५ या काळादरम्यान या टॉवरचे निर्माण केले गेले. या टॉवरला ‘म्युझियम ऑफ फ्लिंट’ या नावाने देखील ओळखले जाते. हा टॉवर पूर्व बेल्जियमच्या बॅसेंज प्रांतामध्ये आहे. या टॉवरचा अंतर्गत भाग बायबलवर आधारित अनेक तऱ्हेच्या कलाकृतींनी भरलेला आहे. तसेच या टॉवरच्या खाली अनेक तळघरे आणि बोगदे देखील आहेत. या बोगद्यांमध्ये अनेक प्राचीन वस्तू सापडल्या असल्याचे गार्सेटचे म्हणणे आहे.
projects3
फ्रांसमधील एक लहानशा गावामध्ये पोस्टमनची नोकरी करीत असलेल्या फर्डिनांड शेवाल याला ड्युटीवर जात असताना वाटेमध्ये एक दुर्मिळ दगड सापडला. त्यानंतर ड्युटीवर जात असताना असे दगड शोधत राहण्याचा फर्डिनांडला जणू छंदच जडला. सुरुवातीला असे दगड फर्डिनांड आपल्या खिशांमध्ये भरून आणीत असे. त्यानंतर त्याने या कामी पिशवी वापरण्यास सुरुवात केली आणि कालांतराने हे दगड वाहून नेण्यासाठी फर्डिनांड चक्क हातगाडी नेऊ लागला. पाहता पाहता त्याच्याकडे जमा झालेल्या दगडांनी फर्डिनांडने ‘पॅले आयडियल’ हे घर बनविले. हे घर बांधण्यासाठी दगडांना जोडून ठेवण्यासाठी त्याने चिकन वायर, सिमेंट आणि चुन्याचा वापर केला. त्याने तयार केलेल्या या कलाकृतीला अनेक मोठमोठ्या शिल्पकारांनी पसंती दिली.
projects4
भारतातील पंजाब राज्यातील चंडीगड येथे रोड इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या नेकचंद यांनी चंडीगढ येथे तेरा एकर जागेमध्ये टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून एक मोठे उद्यान तयार केले. या उद्यानामध्ये असलेल्या कलाकृती फुटक्या काचा, मोडलेली क्रोकरी, बांगड्या, लोखंडाचे तुकडे अश्या प्रकारच्या टाकाऊ वस्तू वापरून त्यांनी तयार केल्या. हे उद्यान पाहिल्यानंतर हे नष्ट करण्याऐवजी सार्वजनिक स्थळ म्हणून याचा विकास केला जावा अशी मागणी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली. आज हेच चंडीगढ येथील सुप्रसिद्ध रॉक गार्डन चाळीस एकरांच्या भूभागामध्ये विस्तारलेले आहे.

Leave a Comment