“अजितदादा मी पण फाटक्या तोंडाचा… बोललो तर महागात पडेल”


कोल्हापूर – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबद्दल बोलताना सगळे झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेले, असे वक्तव्य केले होते. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला त्यांच्या शैलीतून उत्तरे दिलं. अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर संताप अनावर झालेल्या पाटलांनी पवारांना गर्भित इशाराच दिला. आपण ज्या भाजपसोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलत आहोत, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर प्रहार केला आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दुसऱ्यांदा सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने कोल्हापूर येथे आज कोरोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या भूमिकेबद्दल देखील मत व्यक्त केले.

भाजपवर टीका करताना अजित पवार यांनी तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही देखील फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो, तर तुम्हाला महागात पडेल. झोपेत असताना सरकार कसे आणायचे, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. शरद पवार झोपेत असताना तुम्ही सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. पण, अजित पवार यांना आपण काल काय केले होते, ही गोष्ट लक्षात राहत नसल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

कुणीही तलवारीचा धाक दाखवून अजित पवारांना शपथविधीसाठी नेलेले नव्हते. त्यामुळे ज्या भाजपसोबत आपण तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलत आहोत, याचे भान त्यांनी बाळगायला हवे. तुम्हाला तुमच्यासोबत राष्ट्रवादीचे २८ आमदार ठेवता आले नाहीत. शरद पवारांकडे ते पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे. अजित पवारांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती असल्याची टीका पाटील यांनी केली.

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात केलेल्या सर्व मागण्यांना भाजपचा पाठिंबा आहे. पण केवळ कोरोना काळात रस्त्यावर उतरून संघर्ष नको, ही संभाजीराजेंची भूमिका आम्हाला मान्य नाही. राज्यात सगळे सुरळीत सुरु असल्यामुळे कोरोना काळात रस्त्यावर उतरून संघर्ष नको. शांत बसा, हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजे रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असतील, तर भाजप त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.