अशा प्रकारे ओळखाल लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे, लक्षणे आढळल्यास काय कराल?


देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. कोरोनाने गेल्या काही दिवसांत लहान मुलांना आपले लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांमध्ये 12% रुग्णांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आहे. अशात सरकारने कोरोनावर उपचारासाठी वेळोवेळी गाइडलाइन सुद्धा जारी केल्या.

लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत किती धोका यावर अजुनही वेग-वेगळी मते आहेत. लहान मुलांना कोरोना झाल्यास घाबरू नये, असे काही तज्ज्ञ सल्ले देत आहेत. कोरोना झालेल्या बहुतांश लहान मुलांमध्ये लक्षणे सुद्धा दिसून आलेली नाहीत. काही मुलांमध्ये कोरोनाची हलक्या लक्षणांपासून गंभीर लक्षणे सुद्धा दिसून आली आहेत. त्यावर सरकारने सुद्धा गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार, लहान मुलांमध्ये कोरोना कसा ओळखता येईल आणि काळजी कशी घ्यावी हे सांगण्यात आले आहे. लहान मुलांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर घरात उपचार करणे शक्य आहे.

कोरोनाची कोणती लक्षणे लहान मुलांमध्ये असू शकतात? आरोग्य मंत्रालयाने याचे 4 टप्प्यात विभाजन केले आहे. कोरोनाची विविध लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून येत असल्याने त्यांची अशी विभागणी करण्यात आली आहे.

 • अशी मुले ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत.
 • असे चिमुकले ज्यांना कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. त्यामध्ये ताप, खोकला, श्वास घेण्यात अडथळे, थकवा, अंगदुखी, सर्दी, घशात खव-खव, अपचन, स्वाद आणि वास न येणे इत्यादी.
 • ज्यांना मध्यम लक्षणे आहेत. मध्यम लक्षणांमध्ये पोट आणि आतड्यांसंबंधित विकार होई शकतात. परिस्थिती बिघडल्यास त्यांना गंभीर लक्षणांत सुद्धा समाविष्ट करता येईल.
 • गंभीर लक्षणे असलेली मुले. काही मुलांमध्ये मल्टी सिस्टम इन्फलेमेटरी सिंड्रोम नावाची समस्या होऊ शकते. यात मुलांना 100 डिग्रीपेक्षा अधिक ताप असतो. हा सिंड्रोम SARS-CoV-2 शी संबंधित आहे.

हलकी लक्षणे असलेल्या मुलांची काळजी कशी घ्याल?

 • घरातच त्यांचे ऑक्सिजन लेव्हल ताप चेक करत राहावे. एक चार्ट तयार करा आणि ताप येण्याचे प्रमाण आणि वेळ नोंद ठेवा.
 • तापासाठी पॅरासिटामोल देऊ शकता, घशात खव-खव किंवा सर्दीसाठी कोमट पाण्याच्या गुळण्या करायला लावाव्या.
 • पोट बिघडल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. अशात फळांचा रस आणि नारळ पाणी जास्तीत-जास्त द्या. आपल्याच मर्जीने अँटीबायोटिक देऊ नका.
 • अशा वेळी कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही.

मध्यम लक्षणे असलेल्या चिमुकल्यांची काळजी कशी घ्याल?

 • अशा मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल.
 • मुलांना पातळ जेवण द्यायला हवे. तान्ह्या मुलांसाठी आईचे दूधच उत्तम राहील.
 • मुले जेवत नसतील तर त्यांना पातळच खायला द्यावे.
 • ताप आल्यास पॅरासिटामोल देऊ शकता.
 • बॅक्टेरिअल इंफेक्शन झाल्यास एमोक्सिलिन दिले जाऊ शकते.
 • ऑक्सिजन लेव्हल घसरल्यास कृत्रिम ऑक्सिजनची देण्याची गरज राहील.
 • लक्षणे तशीच राहिल्यास कॉर्टिकोस्टरोइड्स दिले जाऊ शकतात.

गंभीर लक्षणे असल्यास उपचार कसे?

 • छातीचा एक्स रे, कंप्लीट ब्लड काउंट, यकृत आणि मूत्रपिंडाची तपासणी करावी.
 • यकृत आणि मूत्रपिंडात काही इन्फेक्शन असल्यास रेमडेसिविर दिले जाऊ शकते.

वजनानुसार दिला जातो डोस

 • यात 3.5 – 4 किलो वजनी मुलांना पहिल्या दिवशी 5 एमजी, त्यानंतर 4 दिवस 2.5 एमजी
 • 4-40 किलो वजनी मुलांना पहिल्या दिवशी 200 एमजी, नंतर 4 दिवस 100 एमजी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, फेविपिरावीर, आयवरमेक्टिन यांची गरज नाही

दरम्यान कोरोनाबाधितांना भोपाळच्या कॅन्सर रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर पूनम चंदानी यांच्या मते, शरीराच्या वेग-वेगळ्या अवयवांमध्ये अर्थात हार्ट, किडनी, लंग्स, डोळे, त्वचा, ब्रेन इत्यादींमध्ये इंफेक्शन होत आहे. त्यालाच मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम म्हटले जात आहे. यावर अजुनही संशोधन सुरू असल्यामुळे याला अद्याप आजार घोषित करण्यात आलेले नाही.

या स्थितीवर अद्याप मुबलक आकडेवारी किंवा माहिती उपलब्ध नाही. तरीही ज्यांना याची लागण झाली ते लहानगे कोरोनाबाधित झालेले होते किंवा कोरोना संक्रमितांच्या संपर्कात आले होते. सविस्तर संशोधन आणि डेटा उपलब्ध नसल्याने लहान मुलांना कोरोना संक्रमितांपासून दूर ठेवलेलेच बरे. त्याचबरोबर लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी घरातील मोठ्यांनी लस घेणे आवश्यक बनले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही