मग त्यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी संसदेत का तोंड उघडले नाही?; कोळसे-पाटील


पुणे: माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांच्यावर टीका केली आहे. 102वी घटना दुरुस्ती ज्यावेळी संसदेत करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते. मग त्यांनी त्यावेळी तोंड का उघडले नाही?, असा सवाल कोळसे-पाटील यांनी केला आहे.

‘टीव्ही9 मराठी’ला दिलेल्या मुलाखती दरम्यान बी. जी. कोळसे-पाटील यांनी हा सवाल विचारला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. मराठा समाजाला आरक्षण देणे हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात असल्याचे सांगतानाच ज्यावेळी संसदेत 102 वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते, मग त्यांनी तोंड का उघडले नाही?, असा सवाल कोळसे-पाटील यांनी केला आहे.

सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात फक्त राजकीय खेळी खेळली जात आहे. ज्या मागण्या केल्याचे संभाजीराजे सांगत आहेत, त्यातून फक्त मराठ्यांच्या नावाने राजकारण केले जात असल्याचा आरोपही कोळसे-पाटील यांनी केला आहे.