यूएईमध्ये खेळवले जाणार आयपीएलचे उर्वरित सामने


मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित सामन्यांचे आयोजन आता संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये करण्यात येणार आहे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीसीसीआयच्या झालेल्या बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात येतील अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. पण याबाबत बीसीसीआयने अद्यापपर्यंत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नव्हते. पण आज (29 मे) आयपीएल 2021 बाबत बीसीसीआयने एक बैठक बोलावली. त्यात आयपीएलमधील उर्वरित 31 सामने खेळवण्यासाठी यूएईची निवड करण्यात आली.

9 एप्रिलपासून मुंबई आणि चेन्नई संघातील सामन्यापासून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात झाली होती. सुमारे 25 दिवस ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करण्यात बीसीसीआयला यश आले. पण अहमदाबाद आणि दिल्ली संघ पोहोचल्यानंतर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बीसीसीआयने दोन सामने टाळण्यानंतर अखेर 3 मे रोजी चौदावा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. चौदाव्या मोसमात साखळी फेरी आणि प्ले ऑफ असे एकूण 60 सामने होते. ही स्पर्धा स्थगित होईपर्यंत 29 सामने खेळवण्यात आले होते, तर आता उर्वरित 31 सामने यूएईमध्ये खेळवले जातील.

बीसीसीआयने आयपीएलच्या 14व्या हंगामाचे उरलेले सामने खेळवले नसते तर त्यांना सुमारे 3 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले असते. दरम्यान ही स्पर्धा कधीपासून सुरु होणार याच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार 18 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात आयपीएलमधील शिल्लक राहिलेले सामने खेळवण्यात येतील.