कोरोना काळात दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदत करणार केंद्र सरकार


नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटकाळात अनेक मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यांनी अशा मुलांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. आता या मुलांसाठी केंद्रातील मोदी सरकारनेही पुढाकार घेतला आहे. ‘पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत कोरोनाकाळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. अशा मुलांना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासिक वेतन मिळणार आहे. तर 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे. तसेच उच्च शिक्षणासाठी या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यात मदत केली जाणार असून अशा कर्जावरील व्याज पंतप्रधान मदत निधीतून दिले जाणार आहे. अशा आयुष्मान भारत अंतर्गत मुलांचा 18 वर्षांपर्यंत 5 लाखांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. या विम्याचा हप्ता पीएम केअरद्वारे भरला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोरोनामुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना मिळत रहावे. एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करत दरमहा 2500 रुपये मदत मंजूर करावी अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. तत्पूर्वी या मुलांना अशा पद्धतीने मदत करण्याचा निर्णय सर्वात आधी मध्य प्रदेश सरकारने घेतला होता.

सद्यस्थितीत कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव आणि त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तींचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्यामुळे ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे.