संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तरच महाराष्ट्राच्या राजकारणातील शिळेपणा दूर होईल : प्रकाश आंबेडकर


पुणे : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणातील शिळेपणा दूर होईल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छत्रपती संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे. पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद, बाबासाहेब आणि शाहू महाराज एकत्र होते, तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका राजकीय नाही. आरक्षणाला भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे.

ते म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न पुढे घेऊन जायचा असेल सत्तेचा गाभा असायला हवा. आरक्षणाचे पुरावलोकन करायचे असेल तर पुनर्विचार याचिका करता येते पण राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून देखील आपण पुनरावलोकन करु शकतो. त्यासाठी राज्यसत्ता हवी. राज्यसत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे. पण आम्ही प्रयत्न करणार असल्याचे चर्चेच्या दरम्यान असे ठरले

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदारांना आमंत्रित करणार आहोत. आत्ता कोणीही समाजाला वेठीस धरु नये. शरद पवारांचे राजकारण नेहमी नरो वा कुंजरोवा अशाप्रकारचे राहिले आहे. पण शरद पवार येथून पुढे स्पष्ट भूमिका घेतील, अशी अपेक्षा आहे. आज ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा आलेला निर्णय कायदेशीर असल्चाचे मी मानत नसल्याचे ते म्हणाले. ओबीसी आरक्षण अझम्शन बेस्ड असल्याचेही ते म्हणाले.