सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षांबाबत सुनावणी


नवी दिल्ली – आज सर्वोच्च न्यायालयात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (आयसीएसई) मंडळाच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी थेट रद्द करण्याची मागणी याचिकेत आली करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी सोमवारी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

परीक्षेसाठी सध्याची स्थिती योग्य नाही. परीक्षा पुढे ढकलल्यास निकालास उशीर होईल. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासावर होईल. त्यामुळे परीक्षा रद्द करावी. कशा प्रकारे विद्यार्थ्यांना गुण देता येतील, यावर लवकर विचार करण्यात यावा, जेणेकरून निकाल लवकरात लवकर जाहीर करता येणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे.

न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठापुठे या संदर्भात शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी यावेळी याचिकाकर्त्या ममता शर्मा यांना या याचिकेची प्रत यापूर्वी सीबीएसई आणि आयसीएसईच्या वकिलांना दिली आहे का? असा सवाल केला. शर्मा यांनी त्यावर आज वकिलांना आगाऊ प्रत पाठवतील असे सांगितले. खंडपीठाने सुनावणी होण्यापूर्वी तुम्हाला हे काम करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, सरकार एक जून रोजी परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेईल. सरकारचा निर्णय हा कदाचित तुमच्या बाजूने लागू शकतो. तुम्ही आशा बाळगू शकता असे कोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितले.