देशात 44 दिवसांनी झाली सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली : तब्बल 44 दिवसांनी देशात कोरोनाबाधितांची सर्वात कमी संख्या नोंदवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकेडवारीनुसार, काल दिवसभरात 1 लाख 86 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3660 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 2 लाख 59 हजार 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी काल दिवसभरात 76,755 रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 2,11,298 लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 3847 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.

तर देशभरात 27 मेपर्यंत 20 कोटी 46 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर काल दिवसभरात 18 लाख 85 हजार 805 लसीचे डोस देण्यात आले. तसेच आतापर्यंत 33 कोटी 90 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या. काल दिवसभरात 20.70 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्के आहे.

गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देशात कहर करणाऱ्या कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमध्ये सातत्याने शिथिलता आणली, तरीही देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असणार आहे, असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार मागील 20 दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. मागील आठवड्याभरात 24 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट पाहायला मिळाली आहे. देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवलेली असताना मागील 3 आठवड्यांपासून पॉझिटीव्हीटी रेट कमी झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. याच आधारे देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरण्यास सुरुवात झाली असून, नियमांमध्ये शिथिलता येत असतानाही हेच चित्र कायम राहणार असल्याचे आश्वासक वक्तव्य आरोग्य मंत्रालयाने केले.

महाराष्ट्र आज 21,273 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज 34,370 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 425 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 3,01,041 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 52,76,203 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.02 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 425 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.63 टक्के एवढा आहे.