मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे यांच्यावर निलेश राणेंनी केली टीका


मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. तसेच या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. तर केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारकडे यावरुन महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बोट दाखवत आहे. तर महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा दावा राज्यातील भाजपचे नेते याला करत आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाच भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मराठा आरक्षणासाठी राज्यात दौरे करत असून, राजकीय नेत्यांच्या भेटीही घेत आहे. या दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे.

छत्रपती संभाजीराजे राज्याच्या राजकारणात ज्वलंत मुद्दा बनलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सध्या महाराष्ट्राभर दौरे करत असून, मराठा समाजाचे म्हणणे ऐकून घेत आहेत. त्याचबरोबर विविध विधिज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांशीही संभाजीराजे यांनी आतापर्यंत भेटी घेतल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच संभाजीराजे यांनी भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजीराजे यांच्या या भेटीवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.


संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल, तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, असे ट्विट करत निलेश राणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली आहे.

तर दूसरीकडे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही छत्रपती संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या भेटीवर टीका केली होती. लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकतो. पण, मराठा आरक्षणाविषयीचा शरद पवार यांचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा १० मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे म्हणत असतील तर पुढे काय होते ते बघू, असे म्हणत संभाजीराजे यांच्यावर मेटे यांनी निशाणा साधला होता.