31 मेनंतर केरळच्या किनाऱ्यावर धडकू शकतो मॉन्सून : हवामान विभाग


मुंबई : मॉन्सून 31 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज जर खरा ठरला तर देशात दक्षिणी राज्यांमध्ये मॉन्सून वेळेआधीच दाखल होणार आहे. मालदीव-कोमोरिन भागातील काही भागांत गुरुवारी मॉन्सून पुढे सरकला असून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व आणि पूर्व-मध्य प्रदेशांवर पोहोचला आहे.

पावसाळ्यासाठी अनुकूल परिस्थिती केरळच्या काही भागांत निर्माण होत आहे. केरळमधील बऱ्याच भागांत या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. एर्नाकुलम, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, पठानमथिट्टा आणि जिल्ह्यांमध्ये 24 तासांसाठी पावसाची नोंद करण्यात आली असून तिरुअनंतपुरममध्ये 19 मिमी ते 115 मिमी दरम्यान पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान विभाग केरळमध्ये मॉन्सून धडकण्याची घोषणा तेव्हाच करते जेव्हा 10 मे नंतर कोणत्याही वेळी सलग दोन दिवस निर्धारित 14 हवामान विभागांवरून 2.5 मिमी किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता असल्याच्या सूचना देण्यात येतात. तसेच मॉन्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे इतर घटक म्हणजे वारा आणि आऊटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशनचे मूल्य. या सर्व घटकांचे मूल्यमापनही केले जाते.

भारतीय हवामान विभागाने 10 मेनंतर कोणत्याही वेळी सलग दोन दिवसांसाठी केरळमध्ये 2.5 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याच्या सूचना दिल्या आहेत. अशातच 31 मे रोजी हवामान विभाग आगामी हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर करण्यास तयार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते मे या कालावधीत देशभरात 15 टक्के पाऊस झाला. ईशान्य राज्ये, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात सध्याच्या मॉन्सूनपूर्व हंगामात सामान्य किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.