मुलाचा राधे चित्रपट पाहून वडील सलीम खान यांचा झाला अपेक्षाभंग


या रमजान ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा बहुचर्चित राधे हा चित्रपट रिलीज करण्यात आला. प्रेक्षक आणि समिक्षकांचा या चित्रपटाला मिश्र प्रतिसाद मिळत आहे. सलमानच्या ढासू अॅक्शन सीनवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. तर टीकाकारांनी जोरदार खिल्ली उडवत भाईजानला ट्रोल केले. आता राधे पाहून सलमानचे वडील सलीम खान यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा काही चांगला चित्रपट नसल्याची रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

बॉलिवूडमधील नामांकित पटकथा लेखक, दिग्दर्शक म्हणून सलीम खान हे ओळखले जातात. त्यांनी आजवर शोले, दीवार, डॉन, जंजीर, मिस्टर इंडिया यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राधे पाहिल्यानंतर ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. परंतु त्यांनी आपल्या मुलाच्या मोहात न पडता एक समिक्षक म्हणून आपली तटस्थ प्रतिक्रिया दिली.

सलीम खान दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, राधे हा ठिक ठाक चित्रपट होता. पण बजरंगी भाईजान किंवा दबंगशी याची तुलना करता येणार नाही. दिग्दर्शकाने एक मसाला चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल फसला आहे. राधे हा सलमानच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे, असे मला वाटत नाही. आपल्या चाहत्यांना सलमानने असे निराश करु नये, असा सल्ला देखील दिला आहे.

सलमानच्या कारकिर्दीतील राधे हा चित्रपट आजवरचा सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला आहे. IMDB वर तर या चित्रपटाला 10 पैकी केवळ 1.2 स्टार मिळाले आहेत. या चित्रपटावर बहुतांशी प्रेक्षकांनी टीकाच केली आहे. हा चित्रपट कुठल्याच पातळीवर वॉण्टेडचा सिक्वल वाटत नसल्याचे मत अनेक चाहत्यांनी देखील व्यक्त केले.