कोरोनाच्यामुळे गंभीर झालेल्या १० टक्के लोकांचे जीव डॉक्टरांनी वाचवले. पण, आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उपचारांनी ९० टक्के लोकांचे वाचवले जीव


नवी दिल्ली – कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यानंतर जगभरातील विविध शास्त्रज्ञांनकडून त्याच्यावरील परिणामकारक ठरणारी लस आणि औषधीच्या शोधाला सुरूवात झाली आणि लस विकसित झाली. बाबा रामदेव यांच्या पंतजलि योगपीठाने याच काळात कोरोनावर परिणामकारक औषध शोधल्याचा दावा केला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे औषध बाजारातही आले. पण, बाजारात आलेल्या कोरोनील किटवरून बराच वादंगही निर्माण झाले. पण अद्यापही कोरोनीलचा समावेश केंद्राने कोरोना उपचार औषधांच्या यादीत केलेला नाही. तर दुसरीकडे अनेक राज्यात कोरोनील किट वाटले जात आहे. बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत या सगळ्या वादावर उत्तर दिले आहे.

बाबा रामदेव यांनी देश कोरोना संकटाला तोंड देत असतानाच अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीची थट्टा उडवली होती. त्याचबरोबर त्यांनी अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांबाबतही अवमानजनक वक्तव्य केले होते. या विधानांवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेल्या बाबा रामदेव यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

ज्या लोकांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ७० टक्क्यांवर गेली होती. ते लोकही योग आणि घरगुती उपचाराने बरे झाले आहेत. ९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज पडली नाही, असे डॉ. गुलेरिया म्हणाले आहेत. मी म्हणतो की, ९५ ते ९८ टक्के लोकांवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही. आयुर्वेद आणि योगामुळे हे सगळे घडल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले.

त्यांना याच मुद्द्यावरून मग केंद्र सरकारने कोरोना औषधांच्या किटमध्ये कोरोनीलचा समावेश का केला नाही?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. बाबा रामदेव त्यावर बोलताना म्हणाले, हा दोष आमचा नाही, तो दोष सरकारच्या धोरणांचा आहे. तुम्ही हे आमच्यावर का लादता? देशातील कोणत्याही शहरात जाऊन तुम्ही बघा, १०० पैकी ९० रुग्ण योग, प्राणायाम आणि आयुर्वेदीक उपचार पद्धतीने बरे झाले आहेत. मग असे कसे म्हणता की अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धती व डॉक्टरांनीच लोकांचे जीव वाचवले? स्वतःचे प्राण गमावून रुग्णांचे अनेक डॉक्टरांनी जीव वाचवले. त्यांचे आभारच. त्यांना अशा संकटाच्या काळात मदत करायलाच हवी ना, नाहीतर वैद्यकीय विज्ञानाला काय अर्थ राहिल, असे बाबा रामदेव म्हणाले.

हे मी मान्य करतो की, कोरोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या १० टक्के लोकांचे जीव डॉक्टरांनी वाचवले. पण, आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उपचारांनी ९० टक्के लोकांचे जीव वाचवले आहेत. मग माझ्या बोलण्यावर डॉक्टरांचा आक्षेप का आहे? कारण याच्याशी संबंधित त्यांचा व्यवसाय आहे. पण, ते ताकदीच्या जोरावर सत्य लपवू शकत नाहीत. अ‍ॅलोपॅथीचा मी विरोधक नाही. अत्यावश्यक प्रसंगी उपचार करण्यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड काम केले आहे. पण, लाईफस्टाईलमुळे निर्माण होत असलेल्या आजारांवर त्यांच्याकडे कोणताही उपाय नसल्याचे बाबा रामदेव म्हणाले.