ब्रिटीश सुपरकार मॅक्लारेन भारतात एन्ट्री घेणार

प्रीमियम ब्रिटीश सुपरकार निर्माती कंपनी मॅक्लारेन भारतात लवकरच एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून कंपनीने भारत प्रवेशाची जोरदार तयारी सुरु केली असल्याचे समजते. सध्या मॅक्लारेनची भारतीय बाजारात नगण्य उपस्थिती आहे पण कंपनीने भारतीय ग्राहकांना अधिकृत विक्री पश्चात सेवा सपोर्ट देण्यासाठी डीलर बरोबर भागीदारी करार केल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या वेबसाईटवर भारताला कॉन्ग्फिगरेशन सेक्शन मध्ये लिस्ट केले गेले आहे.

मद्रास एग्झॉटिक कार क्लबचे संस्थापक आणि अनेक सुपरकार्सचे मालक मनोज लुल्ला यांनी युके मध्ये मॅक्लारेनच्या टेक्निकल सेंटर मधून सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली असून त्यात अखेर मॅक्लारेनची भारतात एन्ट्री असे लिहिले आहे. या कार्सच्या भारतातील किमती बाबत पुढील आठवड्यात खुलासा होईल असे म्हटले आहे. मॅक्लारेन सुपर, स्पोर्ट्स व अल्टिमेट सिरीज परफॉर्मन्स कार म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा पूर्ण प्रोडक्ट पोर्ट फोलीओ कार्बन फायबर स्ट्रक्चरवर आधारित आहे.

मॅक्लारेन जीटी, आर्टरा, ७२० एस आणि ७२० एस स्पायडर अशी चार मॉडेल भारतात लोम्बर्गिनी, पोर्शे, फेरारी आणि मर्सिडीज एएमसी शी स्पर्धा करतील असे समजते.