जेफ बेजोस सोडणार अमेझॉनची कमान

जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अमेझॉनचे मालक आणि सीईओ जेफ बेजोस यांनी कंपनीला २७ वर्षे होतील तेव्हा सीईओ पद सोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बेजोस एक्झीक्युटीव्ह चेअरमन म्हणून कंपनीचे काम पाहतील पण त्यांचा प्रमुख रोख रॉकेट शिप कंपनी ब्यु ओरिजिन आणि द वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाचा कारभार पाहण्याकडे असेल असे समजते. अमेझॉनच्या सीईओ पदाची जबाबदारी बेजोस यांच्या नंतर अँडी जेसी यांच्याकडे सोपविली जाणार आहे.

जेफ अमेझॉनचे सीईओ झाले १९९६ मध्ये. कंपनीची स्थापना त्यांनी १९९४ मध्ये केली होती. इंटरनेटवर पुस्तक विक्रीची सुरवात करून त्यांनी कंपनी कारभाराची सुरवात केळी. शेअरधारकांना उद्देशून बोलताना बेजोस म्हणाले, मी राजीनाम्यासाठी ५ जुलै २०२१ ही तारीख निवडली आहे. कारण या दिवशी अमेझॉनला २७ वर्षे होत आहेत. फेब्रुवारी मध्येच बेजोस यांनी अमेझॉनचे सीईओ पद सोडणार असल्याची घोषणा केली होती मात्र तारीख जाहीर केली नव्हती.

५७ वर्षीय बेजोस यांची संपत्ती १६७ अब्ज डॉलर्स असून जागतिक श्रीमंत यादीत सध्या ते दोन नंबरवर आहेत. अमेझॉनच्या माध्यमातून अनेक प्रकारची उत्पादने विक्री आणि वितरण केले जाते. विशेष म्हणजे १८० पेक्षा जास्त, प्रतिष्ठेची ऑस्कर्स आणि १०० हून अधिक ग्रॅमी पुरस्कार प्राप्त केलेल्या एमजीएम स्टुडीओजचे अमेझॉन ने नुकतेच अधिग्रहण केले आहे